
एससीजीवर सुरू असलेल्या अॅशेस कसोटीतील चौथा दिवस म्हणजे चढ-उतारांचा झंझावात ठरला. जेकब बेथेलच्या ऐतिहासिक पहिल्या कसोटी शतकाने इंग्लंडला उभारी दिली; पण दिवसाच्या अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी इंग्लंडच्या डावाला हादरा देत सलग विकेट टिपत सामन्याची सूत्रे पुन्हा आपल्या हातात घेतली. खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने दुसऱया डावात 302 धावा करत 8 विकेट गमावल्या होत्या. पहिल्या डावात मोठी पिछाडी असल्यामुळे इंग्लंडकडे केवळ 119 धावांची आघाडी असून कसोटीवर ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे. विशेष म्हणजे सिडनी कसोटी पाचव्या दिवसांपर्यंत पोहोचली आणि हाच दिवस अधिक थरारक असेल. फक्त इंग्लंड मालिकेचा शेवट 2-3 असा करतो की ऑस्ट्रेलिया 4-1 अशा विजयासह अॅशेसचे यश आणखी द्विगुणित करतो, याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.
चहापानानंतर इंग्लंडने 179 धावांवर 3 विकेट्स अशा स्थितीतून खेळ सुरू केला. जेकब बेथेल आणि हॅरी ब्रूक यांनी आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवली. अवघ्या 22 वर्षांच्या बेथेलने आपले पहिले कसोटी शतक पूर्ण करत खास विक्रम आपल्या नावावर केला. मात्र 52 व्या षटकांत ब्यू वेब्स्टरने सामन्यात एका क्षणात कलाटणी देणारा मारा केला. आधी ब्रूकला 42 धावांवर बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर विल जॅक्सला शून्यावर माघारी पाठवत इंग्लंडला दुहेरी धक्का दिला.
इंग्लंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न करणारा यष्टिरक्षक फलंदाज जॅमी स्मिथ 26 धावांवर स्थिरावत असतानाच 65 व्या षटकांत मार्नस लाबुशेनने त्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्स अवघ्या पाच चेंडूंमध्ये एक धाव करून ब्यू वेब्स्टरच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे झेल देत बाद झाला. 65.2 षटकांत इंग्लंडची 7 बाद 267 अशी दुर्दशा झाली. मग फलंदाजीला आलेल्या ब्रायडन कार्सने 16 धावा जोडल्या; पण 71व्या षटकांत स्का@ट बोलँडने त्यालाही बाद करत इंग्लंडला आठवा धक्का दिला. दुसऱया टोकाला मात्र बेथेल खंबीरपणे उभा राहिला. मॅथ्यू पॉट्ससोबत संयमी खेळ करत त्याने आणखी कोणतीही विकेट पडू दिली नाही. इंग्लंडने 75 षटकांत 302 धावा करत 8 विकेट्स गमावल्या. बेथेल 142 धावांवर नाबाद राहिला असून पाचव्या दिवशीही इंग्लंडच्या आशा त्याच्याभोवती फिरणार आहेत. त्याच्या बॅटमधून जितक्या अधिक धावा निघतील, तितका सामना आव्हानात्मक होईल.
दुसऱया सत्राच्या सुरुवातीलाच मायकेल नेसरने 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन डकेटला (42) बाद करत दुसऱया विकेटची 81 धावांची भागीदारी मोडली. डकेटला या अॅशेस मालिकेत दहा डावांत एकदाही अर्धशतक गाठता आले नाही, हा नकोसा विक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला. त्यानंतर बेथेल आणि जो रूट यांनी सावध खेळ केला. बेथेलने 87 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले, तर रूटने याचदरम्यान मालिकेतील 400 धावा पार केल्या. मात्र 32 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर स्का@ट बोलँडने रूटला पायचीत केले. रूट 37 चेंडूंमध्ये केवळ 6 धावा करून तंबूत परतला.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाच्या सकाळी 518 धावांवर 7 विकेट्स अशा स्थितीतून खेळ सुरू केला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने 138 धावांची संयमी खेळी केली, तर ब्यू वेब्स्टरने 71 धावांचे मोलाचे योगदान दिले. ट्रव्हिस हेडने केलेल्या 163 धावांच्या तुफानी खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 567 धावांवर संपला आणि त्यांनी 183 धावांची भक्कम आघाडी उभारली. इंग्लंडकडून मायकेल नेसरने 4 विकेट्स घेतल्या, तर मिचेल स्टार्प आणि स्का@ट बोलँड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.
चौथा दिवस संपता संपता सिडनी ऑस्ट्रेलियाच्या हातात विसावली. आता बेथेलच्या झुंजार खेळावर इंग्लंडची भिस्त आहे. तरी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या टोकदार माऱयामुळे पाचव्या दिवशी सिडनीची खेळपट्टी पुणाला साथ देते, ते उद्या कळेलच.




























































