
सामना ऑनलाईन, नाशिक
निफाड तालुक्यात आज सलग पाचव्या दिवशी शीतलहरींमुळे पिकांवरील दवबिंदू गोठलेले होते. तालुक्यातील उगावमध्ये रविवारी तापमानाचा पारा थेट शून्यावर गेला होता, तर आज 1.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. थंडीच्या लाटेमुळे द्राक्षबागांचे नुकसान झाल्याने यंदा उत्पादनात मोठी घट जाणवणार आहे.
निफाड तालुक्यातील उगाव येथे रविवारी पहाटे 4.30 वाजता किमान तापमान शून्य अंश सेल्सिअस नोंदविले गेले, अशी माहिती शेतकरी तुषार कोल्हे यांनी दिली, तर आज येथे 1.5 अंशावर पारा पोहचला. चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथे आज 2, निफाडच्या कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात 3, कळवणजवळील मानूर येथे 4.4, तर नाशिक शहरात 7.2 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. पुढील तीन दिवस अतिथंडीचेच राहतील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
यापूर्वीही निफाड तालुक्यात नीचांकी तापमान गेले होते. मात्र, यंदाच्या हंगामाप्रमाणे थंडीची लाट सलग काही दिवस कायम नव्हती. यंदा सलग पाच दिवस या तालुक्यातील तापमान 0 ते 3 अंशांदरम्यान आहे. अतिथंडीमुळे द्राक्षबागांसोबत रब्बीची पिके करपू लागली आहेत.
निफाडजवळील उगाव, शिवडी, वनसगाव, खेडे या भागात द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत, पाने करपली आहेत, द्राक्षमण्यांची फुगवणही थांबली आहे. शेकोटय़ा करूनदेखील बागा वाचविणे अशक्य झाले आहे. काही शेतकऱ्यांनी शेडनेटचा वापर करून पाहिला. मात्र, त्याचाही फारसा उपयोग झालेला नाही. दुष्काळावर मात करीत शेतकऱयांनी द्राक्षबागा जपल्या. गेल्या काही वर्षाचा विचार केला तर यंदा द्राक्षपीक समाधानकारक होते. मात्र, थंडीची लाट द्राक्षाचे मोठे नुकसान करणारी ठरली आहे. द्राक्षमणी कमी आकाराचेच राहिले तर त्यांना चांगला भाव मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.



























































