
डॉ. मुकुंद शेवरे यांनी ‘चैतन्यमय जंगल’ उपक्रमात 25 हजारांहून जास्त झाडे महाराष्ट्रातल्या नाशिक जिह्यातील नांदगाव येथील एका अतिदुष्काळी भागात जगवली आहेत.
जागतिक तापमान वाढीमुळे होणारे परिणाम आपण जाणतोच आहोत. बहुतेक करून आपण आपल्या वातानुकूलित कार्यालये व घरात त्याची चर्चा करतो, पण प्रत्यक्षात किती जण प्रत्यक्षपणे बाहेर पडून आपले कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी किंवा जागतिक तापमान वाढीचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत?
जागतिक तापमान वाढ हा संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम शिखर परिषदेचा लाडका विषय आहे. खेदाची बाब अशी की, आतापर्यंत या पृथ्वीतलावरील कोणतीही संस्था हा प्रश्न यशस्वीरित्या हाताळू शकलेली नाही, पण डॉ. मुकुंद शेवरे यांनी याचे गांभीर्य जाणले आणि त्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली. तो उपाय म्हणजे डॉ. मुकुंद शेवरे फॉरेस्ट-‘चैतन्यमय जंगल!’ हे जंगल जागतिक तापमान वाढीशी लढण्यास सक्षम आहे. आजतागायत डॉ. शेवरे यांनी पंचवीस हजारांहून जास्त झाडे महाराष्ट्रातल्या नाशिक जिह्यातील नांदगाव येथील एका अतिदुष्काळी भागात जगवली आहेत.
डॉ. शेवरे एकदा त्यांच्या आध्यात्मिक कार्यासाठी नांदगावला आले असता या प्रकल्पाची संकल्पना सुचली. नांदगावला असताना त्यांच्याकडे पाणी नसल्याने व तहानेने व्याकूळ झालेल्या स्थितीत त्यांना दुष्काळी भागातील लोकांच्या त्रासाची तीव्रता समजली. त्यांनी ठरवले की, या दुष्काळी भागाला हिरव्या पट्टय़ात रूपांतरीत करायचे. ते राज्य शासनाकडे प्रस्ताव घेऊन गेले. जानेवारी 2019 मध्ये महाराष्ट्र शासनाने वन खात्याची 25 हेक्टर जागा देऊ केली.
9 फेब्रुवारी 2019 ला त्यांनी खडकाळ जमिनीत तुटपुंज्या साधनांत 220 रोपे लावून प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाची सुरुवात केली. या 220 रोपांपैकी 200 रोपांनी तग धरला. विशेष म्हणजे 40 ते 45 अंश सेल्सिअस तापमानात ती 200 झाडे जिवंत राहिली. चैतन्य म्हणजे वैश्विक ऊर्जा. या प्रकल्पात झाडांचे संगोपन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका या ‘चैतन्या’ची आहे.
डॉ. शेवरे यांचे देशातील व जगभरातील अशा अनेक ओसाड व दुष्काळी जमिनींवर चैतन्यमय जंगलाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. नुकतेच त्यांना सर्व पर्यावरणप्रेमीसाठी ‘एक झाड दत्तक योजना’ आणली आहे. या उपक्रमात सर्व निसर्गप्रेमी सहभागी होऊ शकतात.
दुष्काळी ते हरितपट्टा
कोणत्याही कल्याणकारी प्रकल्पाचे यश हे तिथल्या लोकांच्या जीवनावर त्याचा किती चांगला परिणाम झाला आहे यावर मोजले जाते. 2019 मध्ये जेव्हा हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा नांदगाव हा संपूर्ण दुष्काळी भाग होता. उन्हाळय़ात येथे फक्त 15 दिवसांतून एकदा पाणीपुरवठा व्हायचा, आजूबाजूच्या नद्या व धरणे कोरडी पडायची. तथापि, मागच्या वर्षीपासून भूजलसाठय़ात इतके मुबलक पाणी आहे की, बाहेरून गावकऱयांना पाणी पुरवण्याची गरजच पडत नाही. अशा प्रकारे डॉ. मुकुंद शेवरे यांनी दुष्काळी भागांसाठी कायमचा उपाय समोर आणला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागाचे ‘दुष्काळी’ ते ‘हरित पट्टा’ असे परिवर्तन झाले आहे.
स्थानिकांना मिळाला रोजगार
‘मुकुंद शेवरे जंगला’मुळे भूजलसाठय़ात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतातील विहिरी आणि बोअरवेल मुबलक स्वरूपात भरल्या गेल्यामुळे शेतकऱयांना याचा खूप फायदा झाला. याव्यतिरिक्त जमिनीची झीज थांबली, वन्यजीव अधिवास स्थापित झाला आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळाला.

























































