सोशल साईटमुळे भटक्या कुत्र्याचे प्राण वाचले

91

सामना ऑनलाईन। नारायणपूर

सोशल साईटमुळे छत्तीसगडमधील नारायणपूरमधल्या एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचला आहे. एका अरुंद मगातील पाणी पिताना या कुत्र्याचं डोकं त्यात अडकलं. यामुळे हादरेला कुत्रा इकडे तिकडे पळू लागला. त्याचवेळी येथील नायब तहसिलदार आशुतोष शर्मा यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. अखेर या कुत्र्याबद्दल त्यांनी सोशल साईटवर पोस्ट टाकली व त्याच्या मदतीसाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांपासून सामान्य जनता व अनेक स्वयंसेवी संस्था कुत्र्याच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या.

१ डिसेंबर रोजी शर्मा नेहमीचे काम संपून घराकडे निघाले होते. त्याचवेळी रस्त्यावर सैरभैर धावणाऱ्या एका कुत्र्याकडे त्यांचे लक्ष केले. त्या कुत्र्याचे डोके एका मगात अडकले होते. यामुळे त्याला पुढचे काहीच दिसत नव्हते. हे बघताच शर्मा यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण कुत्रा त्यांच्या हाताला हिसका देत तिथून पळून गेला. या अवस्थेत कुत्रा जास्त दिवस जगू शकणार नाही. कारण डोकेच मगात अडकल्याने त्याला खाता पिता येत नव्हते. हे शर्मा यांनी ओळखले. त्यानंतर त्यांनी परिसरात कुत्र्याचा शोध घेण्याचा आदेशच कर्मचाऱ्यांना दिला. तेवढेच नाही तर त्यांनी त्या कुत्र्याबद्दल सोशल साईटवर एक पोस्ट टाकली. त्यात कुत्र्याची मदत करावी असे आवाहन त्यांनी जनतेला केले.

या पोस्टला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शर्मा यांनी कुत्ता बचाव कॅम्पेनच सुरू केलं. मीडियानेही या मोकाट कुत्र्याला शोधण्याचे आवाहन केले. यामुळे सगळ शहरच या कुत्र्याचा शोध घेऊ लागलं. यात सामान्य लोकांपासून अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला. यात राज्य सरकारचा वन विभाग, होमगार्ड व महानगरपालिका कर्मचारीही सहभागी झाले होते. त्याचवेळी कुत्रा एका पाण्याच्या टाकीजवळ दिसल्याचा फोन शर्मा यांना आला. त्यानंतर सगळेच तिकडे धावले. अखेर चार दिवसानंतर तहानेने व भुकेने अर्धमेल्या झालेल्या कुत्र्याला पकडण्यात आले व प्राण्यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्या डोक्यात अडकलेला मग काढण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या