
दिघी-माणगाव-पुणे महामार्गाचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे लोटले. मात्र नगरपंचायत व नॅशनल हायवेच्या वादात महामार्गाच्या बाजूला असलेल्या नाल्याची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. साफसफाईच्या नावाने एकमेकांकडे बोटे दाखवली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दिघी-माणगाव-पुणे हा महत्त्वाचा महामार्ग असून तो मोर्बा रोडमार्गे जोडला गेलेला आहे. २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या नॅशनल हायवेचे काम पूर्ण झाले. यावेळी महामंडळाने मोर्बा रस्त्याच्या दुतर्फा गटारे बांधली. मात्र पाच वर्षे उलटले तरीही या उघड्या गटारांमधील गाळ आणि कचरा काढलेला नाही. गटारांच्या चेंबरमध्ये पाण्याच्या आणि दारूच्या बाटल्यांचा खच साचल्याने ते तुंबले आहे. सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ते पाणी उघड्यावर वाहत असून थेट शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. हे सांडपाणी शेतात गेल्याने खांदाड परिसरातील हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे.
अपघात वाढले
महामार्ग प्राधिकरणाकडून बांधलेली गटारे ही पाच फूट खोल असून अनेक ठिकाणांवरील चेंबर उघडी आहेत. रात्री अंधारात आणि पावसाळ्यात या गटारांमध्ये पडून अनेक अपघातही झाले आहेत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन ठोस उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.


























































