
<<गोरख तावरे>>
स्वरस्वामिनी आशा भोसले यांच्याशी संबंधित कराड तालुक्यातील चोरे गावाशी निगडित एक हळवा पैलू समोर आला आहे. त्यांचे सासर असलेल्या या गावात नव्याने उभारलेल्या घराला भेट देण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची वार्ता पसरताच चोरे गावासह कराड परिसरातही शोककळा पसरली.
आशा भोसले यांचे सासर कराड तालुक्यातील चोरे येथे असून, भोसले कुटुंबीयांशी त्यांचे अतूट आणि जिव्हाळ्याचे नाते शेवटपर्यंत कायम होते. गावाशी असलेली ही नाळ त्यांनी कधीही तुटू दिली नाही. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरे गावात नव्याने उभारण्यात आलेल्या घराला भेट देण्याची त्यांची मनापासून इच्छा होती. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे हा योग जुळून आला नाही आणि हे स्वप्न अखेर अपूर्णच राहिले. सुमारे दोन वर्षांपूर्वी त्यांनी चोरे गावाला शेवटची भेट दिली होती. त्यानंतर प्रत्यक्ष येणे शक्य झाले नसले तरी कुटुंबीयांशी त्यांचा संपर्क आणि आपुलकी कायम होती.
श्रद्धा, परंपरांशीही नाते
श्रद्धा आणि परंपरेशी त्यांचे घट्ट नाते असल्याचेही अनेक प्रसंगांतून दिसून येते. पाटण तालुक्यातील निकवणे येथील जानाई देवीच्या दर्शनासाठी त्यांनी विशेष येऊन नवस फेडला होता. एवढेच नव्हे, तर देवीवरील श्रद्धेपोटी त्यांनी आपल्या नातीचे नावही ‘जानाई’ ठेवले होते.
सासर, शेतीमुळे गावाशी घट्ट नाते
आशा भोसले यांच्या वैयक्तिक आयुष्यात कराड तालुक्यातील चोरे गावाशी भावनिक नाळ जुळली होती. मूळचे चोरे गावचे असलेले तबलावादक विशारद गणपतराव भोसले यांच्यासमवेतच्या त्यांच्या सहजीवनातून ही नाळ अधिक दृढ झाली. संगीताच्या प्रवासात एकत्र आलेल्या या दोन कलावंतांनी पुढे आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला आणि विवाहबंधनात अडकले. या नात्यामुळे चोरे गावाशी आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. दोन वर्षांपूर्वी त्या आपला मुलगा व नातवंडांसह चोरे गावी आल्या होत्या. गावातील जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. चोरे गावात त्यांच्या नावावर शेती असून, तिची देखभाल त्यांचे पुतणे चंद्रकांत भोसले करीत आहेत. या शेतीमुळेही त्यांचे गावाशी असलेले नाते अधिक घट्ट राहिले होते.




























































