
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
निवडणूक आयोगासारख्या स्वायत्त संस्थेवरही भाजपने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांना एक आणि विरोधकांना एक न्याय असा पक्षपातीपणा निवडणूक आयोगाकडून केला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना केला.
या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना वाचविण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जनता या निवडणुकीत भाजपला पराभूत करणारच असा दावा त्यांनी केला. सध्या तरी निवडणूक जिंकणे हे काँग्रेसचे लक्ष्य असून पंतप्रधान कोण होणार हे जनताच ठरवेल, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. राफेलबाबत चुकीच्या वक्तव्यासाठी मी न्यायालयाची माफी मागितली, भाजपची नाही. राफेल कराराबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्याची तयारी असल्याचे राहुल यांनी सांगितले.
सैन्य हे देशासाठी असून मोदींची खासगी संपत्ती नाही. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय लाटून त्याचे कुणी राजकारण करू नये. जर मोदी सैन्याने केलेल्या कामगिरीचे श्रेय घेत असतील तर हा हिंदुस्थानी सैन्याचा अपमान आहे, असे राहुल गांधी म्हणाले.



























































