धी गोवा हिंदू असोसिएशनचा प्रायेगिक ‘आविष्कार’ ‘भूमिकन्या सीता’ लवकरच रंगमंचावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

शतक महोत्सवी वर्ष साजरे करणारी धी गोवा हिंदू असोसिएशन ही संस्था सध्या तरी व्यावसायिक नाटक करणार नसून संस्थेने प्रायोगिक नाटकाकडे मोर्चा वळवला आहे. प्रायोगिक नाटकांची पंढरी असलेल्या आविष्कार संस्थेच्या सहकार्याने धी गोवा हिंदू असोसिएशन ‘भूमिकन्या सीता’ हे नाटक लवकरच रंगमंचावर घेऊन येत आहे. यानिमित्ताने संस्थेचा प्रायोगिक ‘आविष्कार’ नाटय़प्रेमींना अनुभवता येणार आहे.

धी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेची स्थापना 24 ऑगस्ट 1919 रोजी झाली. संस्थेचे यंदाचे शतक महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. काही  महिन्यांपूर्वी ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकाची निर्मिंती संस्थेने केली होती, मात्र या नाटकाचे फार प्रयोग होऊ शकले नाहीत. त्यानंतर आता व्यावसायिक नाटकाऐवजी प्रायोगिक नाटकांच्या निर्मितीचा नवा अध्याय गोवा हिंदू असोसिएशन सुरू करणार आहे. याबाबतची माहिती संस्थेचे  अध्यक्ष अनिल काकोडे, संचालक सुरेश पालेकर, उपाध्यक्ष सुभाष सराफ, निरुपा केणी आणि श्रीपाद कबाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आविष्कारचे अरुण काकडे, मानसी कुलकर्णी, विश्वास सोहोनी उपस्थित होते. प्रायोगिक रंगभूमी सशक्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे सुभाष सराफ यांनी सांगितले, तर ‘भूमिकन्या सीता’ नाटकाच्या माध्यमातून सहकार्याचे नवे पर्व मराठी रंगभूमीवर सुरू होत असल्याची प्रतिक्रिया  अरुण काकडे यांनी दिली.

शतकपूर्ती सांगता सोहळा येत्या 25 ऑगस्ट रोजी दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे होणार आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर डॉ. नंदकिशोर लाड हे प्रमुख अतिथी आहेत. मोहनदास सुखटणकर, सुमन तुलसियानी, पंडित अरविंद पिळगावकर, डॉ. अनिल कारापूरकर आणि अशोक सराफ यांना मानद सदस्यत्व दिले जाणार आहे.