
ऊसउत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन आणि खर्चाचा मेळ घालता यावा म्हणून शासनाने प्रतिटन चारशे रुपयांची आर्थिक मदत करावी, असा ठराव कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या 34व्या वार्षिक सभेत एकमताने संमत करण्यात आला. कारखान्याचे संचालक, आमदार प्रकाश आवाडे यांनी हा ठराव मांडला होता.
साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीत झाली. प्रारंभी संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी शेतकरीहिताचा विचार करून कारखान्याची निर्मिती झाली आहे, तो चांगला चालण्यासाठी सर्वांनी साथ करावी, असे आवाहन केले.
आमदार आवाडे म्हणाले, ऋतुमानाच्या बदलाने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. खर्च आणि उत्पादन याचा मेळ बसत नाही. त्यामुळे शासनाने घोषित केलेला प्रतिटन 3100 रुपये दर परवडणारा नसून, 3800 रुपये झाला पाहिजे, त्यासाठी राज्य शासनाने ठराव करून त्याला केंद्र सरकारची मंजुरी घ्यावी. केंद्र, राज्य आणि कारखाना यांनी प्रत्येकी दोन टक्के व्याज द्यावे आणि ही रक्कम परतफेडीसाठी वीस वर्षांची मुदत मिळावी. यापूर्वी राज्य शासनाने 27 फेब्रुवारी 2004 मध्ये मदतीसाठी जीआर काढला होता. त्याच धर्तीवर पुन्हा मदतीची गरज आहे. ही मदत थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा व्हावी, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली.
आमदार आवाडे यांनी जवाहर कारखाना इथेनॉलचा एक लाख लिटरचा प्रकल्प उभारणार असल्याचे घोषित केले. तसेच कारखाना प्रदूषणविरहित उपक्रम राबवणार असल्याचेही स्पष्ट केले. यावेळी संचालक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी हजर होते.
शेतकरी संघटनेच्या नेत्यांना सांभाळून बोलण्याचा इशारा
उसाला दर न घेणाऱ्या चेअरमनच्या कानाखाली मारा, अशी घोषणा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केली होती. याबद्दल बोलताना आमदार आवाडे म्हणाले, दराची मागणी जरूर करा; पण त्यासाठी चुकीचे शब्द वापरू नका आणि इथे तसा कोणी प्रकार करणार असेल तर तो या मंडपाबाहेर जाणार नाही, असा थेट इशारा शेतकरी संघटनेच्या नेत्यांना दिला.



























































