उन्हाची तीव्रता वाढली; पाणी जपून वापरा! अक्कलकोट मुख्याधिकाऱयांचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱया कुरनूर धरणात 112 दक्षलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. अक्कलकोट तालुका दुष्काळी भाग असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. नळाला तोटय़ा बसवाव्यात; अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल. प्रसंगी नळ कनेक्शन बंद करण्याचा इशारा मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी दिला.

अक्कलकोट शहराला कुरनूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मुख्याधिकारी सचिन पाटील, नगरपालिका पाणीपुरवठा अभियंता मेहबूब शेख, पाणीपुरवठा कर्मचारी नुरदीन खलिफा, विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी विनायक डिग्गे म्हेत्रे, ठेकेदार रमेश हारकुड आदींनी कुरनूर धरण परिसरातील कुरनूर, बऱहाणपूर, चुंगी, बावकरवाडी, चप्पळगाव नदीपात्रावरील पाणी उपसा करणाऱया कृषी पंपासह उपलब्ध पाणीसाठय़ाची पाहणी केली. यावेळी मुख्याधिकारी पाटील यांच्या आदेशाने पाणी उपसा करणारे कृषी पंप काढण्यात आले. कुरनूर धरण परिसरातील नदीपात्रावरील डीपीचा विद्युत प्रवाह बंद करण्याबाबत उपकार्यकारी अभियंता यांना कळविण्यात आले आहे.

अक्कलकोट शहराला सध्या आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात़ो शहरात सहा भाग केले आहेत. प्रत्येक भागाला सात ते आठ दिवसाआड एकदा पाणीपुरवठा केला जातो. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने बाष्पीभवनामुळे शिल्लक पाणीसाठा लवकर संपण्याचीही शक्यता आहे. यामुळे हा पाणीसाठा काटकसरीने जास्त दिवस कसा वापरता येईल, याचे नियोजन करावे लागणार आहे.

सहा हजार नळधारक

अक्कलकोट शहरामध्ये मालमत्ताधारक 7500 असून नळग्राहकांची संख्या 6000 इतकी आहे. पाणीपुरवठय़ाच्या दृष्टिकोनातून शहराची सहा भागांत विभागणी केली आहे. प्रत्येक भागाला सहा ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, एका वेळेस 35 लाख लीटर पाण्याचा वापर होतो.

दोन तास पाणीपुरवठा करा

 शहरामध्ये शेकडो नळांना तोटी नाही. पाणीपुरवठा सुरू झाल्यावर तोटी नसल्याने पाण्याचा मोठय़ा प्रमाणात अपव्यय हेते. तांत्रिक कारणामुळे काही भागात पहाटे 5 वाजता सुटलेले पाणी दुपारी 4 वाजेपर्यंत चालू राहते. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी दोनच तास पाणीपुरवठा करा तसेच सहा ते आठ दिवसांऐवजी चार दिवसांतून पाणी सोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.