
तालुक्यातील तिसगाव येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले अवैध कत्तलखाने अखेर पोलीस बंदोबस्तात भुईसपाट करण्यात आले. ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व पंचायत समिती यांच्या संयुक्त कारवाईत ही धडक मोहीम राबविण्यात आली.
तिसगाव येथे गोवंशाची अवैध कत्तल होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत होत्या. पोलिसांनी यापूर्वी कारवाई करूनही कत्तलखाने सुरूच राहिल्याने गोरक्षक मुकुंद गर्जे, बाळासाहेब गीते, आशुतोष शर्मा, सारंग मंत्री, नगरसेवक प्रतीक नांगरे व चांगदेव भालसिंग यांनी कडक कारवाईची मागणी करत उपोषणाचा इशारा दिला होता. या उपोषणात तारकेश्वर गडाचे महंत सहभागी होणार असल्याचे जाहीर झाल्याने प्रशासन सतर्क झाले.
या पार्श्वभूमीवर तिसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात ग्रामपंचायत कार्यालयात गटविकास अधिकारी संगीता पालवे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, संदीप ढाकणे, काशिनाथ पाटील-लवांडे, सरपंच इलियास शेख, उपसरपंच पंकज मगर, सुनील परदेशी तसेच कुरेशी कुटुंबाच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली.
यावेळी काशिनाथ पाटील-लवांडे यांनी सांगितले की, गोहत्या बंदी कायदा अस्तित्वात असताना कायदा हातात घेण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. साधुसंतांना उपोषणाची वेळ येणे हे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीनंतर कुरेशी समाजाच्या नागरिकांनी सर्व कत्तलखाने कायमस्वरूपी बंद ठेवण्याचे मान्य केले.
यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात अवैध कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान सरपंच इलियास शेख, सुनील परदेशी, भैया बोरुडे, गणेश भोसले, राम काळे, गणेश शिंदे, रोहित खंदारे, मयूर कुरे, अक्षय जायभाय, विजय ससाने, अक्षय भुजबळ, दीपक गरुड, शिवम आठरे, प्रवीण परदेशी, रॉबिन पाथरे, प्रशांत लवांडे, ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता.



























































