
सामना प्रतिनिधी । कर्जत
नवीन वर्षाचा पहिला दिवस माथेरानकरांसाठी धक्कादायक ठरला. माथेरान येथील मुस्लिम मोहल्ला येथील सार्वनिक शौचालयाच्या मागे एक मृत नवजात मुलीचे अर्भक सापडले. या घटनेमुळे माथेरानमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सर्वत्र ३१ डिसेंबरचा जल्लोष होता. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये सर्वच बेधुंद झाले होते. मात्र दुसरीकडे मानवतेला हादरवून टाकणारी घटना घडत होती. नवीन वर्षांचा पहिला दिवस उजाडला तोही हादरवून टाकणारी बातमी घेऊन. नेहमी प्रमाणे माथेरान नगरपरीषदेच्या सफाई कर्मचारी प्रमिला नैताम माथेरान मुस्लीम मोहल्ला येथे कचरा गोळा करण्यासाठी गेल्या असता सार्वजनिक शौचालयाच्या मागे नवजात मुलीचे अर्भक दिसले. या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत सफाई कर्मचारी महीलेने सदर घटना मुकादमाला कळवून या घटनेची माहीती माथेरान पोलीसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस ठाण्याचे सहा.फौजदार एस. जी.वागुळे, महीला पो. शिपाई ए.ए. पाटील, पी.एस देशमुख, पोलीस शिपाई एन.पी.निकम, एम.ऐ.राठोड यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
सदर घटनेची माथेरान पोलीस ठाण्यात आज्ञात इसमाच्या विरोधात भा.दं.संहीता ३१८ कलमा नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा अधिक तपास माथेरान पोलीस ठाण्याचे सहा.पो.निरीक्षक महादेव आचरेकर करीत आहेत.

























































