
हिंदुस्थानचा युवा नेमबाज सम्राट राणा आयएसएसएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकून खऱया अर्थाने नेमबाजीचा ‘सम्राट’ ठरला. कर्नालच्या या प्रतिभावान नेमबाजाने अंतिम फेरीत 243.7 गुण झळकावून चीनच्या हू काईला (243.3 गुण) मागे टाकले. ऑलिम्पिकच्या एअर पिस्टल प्रकारात जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा सम्राट पहिलाच हिंदुस्थानी नेमबाज ठरला आहे. तसेच उत्तर प्रदेशातील बागपतचा वरुण तोमरने 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकत हिंदुस्थानचा झेंडा उंचावला. या चुरशीच्या अंतिम फेरीत तिन्ही नेमबाजांच्या स्थानात क्षणाक्षणाला बदल होत होता, पण शेवटी सम्राटच्या स्थिरतेने त्याला विश्वविजेता बनवले.
मनु व ईशा सिंह पाचव्या स्थानी
दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती ईशा सिंह या दोघी महिला 10 मीटर एअर पिस्टलच्या अंतिम फेरीत पदक मिळविण्यापासून थोडय़ाच अंतरावर राहिल्या.
मनूची सुरुवात उत्कृष्ट झाली होती, परंतु 14 व्या निशाण्यावर 8.8 गुण नोंदवल्यामुळे ती आघाडीवरून थेट सातव्या स्थानी (139.5 गुण) घसरली. दुसरीकडे अलीकडेच चीनच्या निंगबो येथे विश्वचषक सुवर्ण जिंकणाऱया ईशा सिंह हिनेही दबावाचा सामना करताना चुक केली. तिने एका टप्प्यावर 10.7 गुणांचा परिपूर्ण शॉट मारत शानदार पुनरागमन केले, पण पुढच्या
शॉटमध्ये 8.4 गुण मिळवत ती सहाव्या स्थानी राहिली.
हिंदुस्थान दुसऱ्या स्थानी
या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानने तीन सुवर्ण, पाच रौप्य आणि तीन कांस्य पदके जिंकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
चीनने सर्वाधिक नऊ सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदकांसह अव्वल स्थान कायम राखले. कोरिया 7 पदकांसह तिसऱया स्थानावर आहे. या जागतिक स्पर्धेत मात्र हिंदुस्थानने आपली ताकद दाखवली. ईशा (583), मनू (580) आणि जगातील क्रमांक एक नेमबाज सुरुची इंदर सिंह (577) यांच्या एकत्रित 1740 गुणांच्या कामगिरीने हिंदुस्थानला रौप्यपदक मिळाले. पात्रता फेरीत ईशाने 583 गुणांसह चौथे स्थान मिळवले आणि एका मालिकेत परिपूर्ण 100 गुणांची मालिका नोंदवली. मनुने 580 गुणांसह सहावे स्थान मिळवून अंतिम आठीत स्थान निश्चित केले.






























































