आचारसंहितेचा फायदा घेऊन भिवंडीत 850 बेकायदा बांधकामांचे इमले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, भिवंडी

दि. 5 – लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फायदा घेऊन  भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात थोडेथोडके नव्हे तर तब्बल 850 बेकायदा बांधकामांचे इमले उभे राहिले आहेत. अनेक अधिकारी व कर्मचारी इलेक्शन डय़ुटीवर असल्याने अनधिकृत बांधकामांवर कोणाचाच वॉच नव्हता. हीच संधी साधून बिल्डर लॉबीने झटपट बेकायदा बांधकामे उभारली असून या इमारतींमध्ये हजारो भिवंडीवासीयांची आता फसवणूक होणार आहे. बिल्डर आणि अधिकारी यांचे मेठे साटेलोटेच असल्यामुळे ही बांधकामे झाली असून कोर्टाचे आदेश धाब्यावर बसवून अन्य 350 बांधकामांनादेखील अभय देण्यात आले आहे.

भिवंडी महापालिका म्हणजे बेकायदा बांधकामांचे शहर बनले आहे. गेल्या चार वर्षांत सुमारे साडेतीन हजार बांधकामे करण्यात आली. शहर विकास विभागातील अधिकाऱयांना चिरीमिरी देऊन बांधकाम आराखडे मंजूर करायचे आणि मनमानीपणे इमारती बांधायच्या हा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 10 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच भिवंडीतील बिल्डर लॉबी बेकायदा बांधकामे करण्यासाठी सक्रिय झाली आणि राजरोसपणे इमारती उभ्या करण्यात आल्या.

प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षकांना निलंबित करणार

आचारसंहितेच्या नावाखाली ज्या प्रभागात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत त्या प्रभागातील प्रभाग अधिकारी व बीट निरीक्षक यांची माहिती मागून टिपणी तयार केली आहे. आचारसंहिता उठल्याबरोबर दोषी प्रभाग अधिकारी व बीट निरीक्षक यांना निलंबित केले जाईल.

– मनोहर हिरे. (महापालिका आयुक्त)

भिवंडी महापालिका क्षेत्रात एकूण पाच प्रभाग समित्या आहेत. त्यातील शांतीनगर, नागाव, कल्याण रोड, टेमघर, भंडारी कंपाउंैड, कासारआळी, ब्राह्मणआळी, बंधन मोहल्ला, कोंबडपाडा, अजयनगर येथे बिल्डरांनी आचारसंहितेच्या काळात बेकायदा बांधकामे केल्याचे आढळून आले आहे.

सध्या मुंबई उच्च न्यायालयात 1793 बेकायदा बांधकामांची दावे सुरू आहेत. त्यापैकी 315 अनधिकृत बांधकामे तोडण्याचे आदेश न्यायालयाने सहा महिन्यांपूर्वी दिले होते. पण आजतागायत त्यापैकी एकही बांधकाम तोडण्यात आलेले नाही.

भिवंडी शहरातील बेकायदा बांधकामे रोखण्याची जबाबदारी उपायुक्त दीपक कुरळेकर यांच्यावर आहे. मात्र त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून तीन हजारांहून अधिक बेकायदा बांधकामे उभी राहिले. महासभेत यावर अनेकदा चर्चा झाली पण कोणताही अंतिम निर्णय झाला नाही.