
सामना प्रतिनिधी । कर्जत
50-55 वर्षे देशाची सत्ता उपभोगलेल्या सरकारने जे केले नाही ते नरेंद्र मोदी सरकारने अवघ्या 5 वर्षात केले असल्याचा दावा खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. कर्जत तालुक्यातील नेरळ येथील निवडणूक प्रचार कार्यलयाच्या उदघाटन प्रसंगी खासदार बारणे बोलत होते.
नेरळ येथे निवडणुक प्रचार कार्यालयाचे उदघाटन केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी ब्रिटिशांनी केलेले परंतु आजच्या घडीला कोणत्याही कामाचे नसलेले आणि कालबाह्य झालेले 250 कायदे बदलण्याचे काम नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून देशाची सत्ता असलेल्यांना त्या कायद्याकडे बघण्यापेक्षा भ्रष्टाचार करण्याकडे जास्त लक्ष होते, असा आरोप यावेळी बारणे यांनी केला. तर आपण 2014 मध्ये लोकसभेत प्रवेश करताना नवखे होतो, पण आपण लोकसभा अधिवेशन काळात 91 टक्के उपस्थितीत राहून लोकसभेत काय चालते हे शिकून घेतले. मात्र तेथे जाऊन खुर्चीत बसण्याचे काम आपल्या खासदाराने केले नाही तर पाच वर्षात सर्वाधिक 1110 प्रश्न आपण मांडले. त्यात 543 खासदार असलेल्या लोकसभेत आपल्याला 289 वेळा प्रत्यक्ष प्रश्न मांडण्याची संधी मिळाली आणि आपल्या माध्यमातून मावळ लोकसभा मतदारसंघातील आणि देश पातळीवर वरील तब्बल 20 खासगी विधेयके देखील मंजूर करून घेण्याचे काम 2014 मध्ये मतदारांनी विश्वास दाखविल्याने शक्य झाल्याचे श्रीरंग बारणे यांनी मान्य केले.
मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे निवडणूक अनामत रक्कम जप्त झाली होती. त्याची आठवण करून देतांना त्यांना पडलेल्या मतांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवायचा आहे, असे आवाहन बारणे यांनी केले.
कर्जत तालुक्यात आपण खासदारकीचा सर्वाधिक निधी दिला असून या लोकसभा मतदारसंघात गरीबांच्या घरात वीज पोहोचावी म्हणून केंद्र सरकारच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण जीवन ज्योती योजनेमधून 35 कोटींचा निधी आणून घराघरात वीज पोहोचविली आहे, असा दावा बारणे यांनी केला. तर माथेरानची नेरळ-माथेरान मिनीट्रेन भविष्यात पुन्हा कधीही बंद पडणार नाही, यासाठी करोडो रुपयांचा निधी देशाच्या अर्थ संकल्पात मंजूर करून घेतला असून त्यातून आलेली नवीन इंजिने, रुळाचे नव्याने होत असलेले काम, नवीन प्रवासी डब्बे यातून दिसत आहे. त्याचवेळी पर्यटनाच्या दर्जाखाली नेरळ, माथेरान आणि लोणावळा या रेल्वे स्थानकात होत असलेले बदल हे आपण मला लोकसभेत पाठविल्याने होऊ शकले, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी आमदार देवेंद्र साटम म्हणाले की, बोलणारा खासदार, सर्वांना सोबत घेऊन जाणारा खासदार, देशहितासाठी झटणारा खासदार म्हणून श्रीरंग बारणे यांची ख्याती आहे. बारणे यांनी रस्त्यांचे जाळे, रेल्वेचा विस्तार, पनवेल विमानतळाचे काम प्रगतीपथावर सुरू केले, जलवाहतूक सुरू केली. नरेंद्र मोदी यांनी जगामध्ये देशाची प्रतिमा उंचावली. बँकांपासून वंचित असलेल्या नागरीकांना बँकिंग प्रणालीमध्ये आणले. अनेक योजनांचा मोबदला बँक खात्यात येऊ लागला. ही क्रांती नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केली. नागरिकांच्या विश्वासावर पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे.
महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचार दौरा केला. नांगुर्ले, मोहिली, तमनाथ, मोहोली, नेवाळी, आवळस, बीड बुद्रुक, चोची, कोंदिवडे, खांडपे, पोसरी, कशेळे, खांडस, वारे, कळंब, साळोख, माले, आसे, आर्ढे, पाषाणे, शेलु आदी गावांना भेटी दिल्या. शिवसेना युवासेना कळंब जिल्हा परिषद विभाग संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले.
नेरळ शहर, ग्रामीण आणि जिल्हा परिषद विभागाचे मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उदघाटन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे, महिला जिल्हा संघटक रेखा ठाकरे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, सरचिटणीस दीपक बेहरे, कर्जत खालापूर विधानसभा संघटक संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, सरपंच जान्हवी साळुंखे, माजी सैनिक सावळाराम जाधव, तालुका संघटक राजेश जाधव, भाजप महिला जिल्हा उपाध्यक्ष समिधा टिल्लू, पंचायत समिती सदस्या सुजाता मनवे, गजुभाई वाघेश्वर, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, माधव गायकवाड, भाजप अल्पसंख्याक सेलचे अब्दुल्ला नजे, माजी सभापती अनंत धुळे, सभापती राहुल विशे, माजी सभापती अमर मिसाळ, भाजप तालुका चिटणीस प्रवीण पोलकम, भाजप ओबीसी सेल मोर्चा जिल्हा सरचिटणीस राजेश भगत, शशिकांत मोहिते आदी उपस्थित होते.































































