नीट सराव परिक्षेचा पेपर अवघड गेला; विद्यार्थ्यांने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानातील कोटा शहरात वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी गेलेल्या अविष्कार संभाजी कासले (वय 17) विद्यार्थ्यांने सराव परीक्षेचा पेपर अवघड गेला म्हणून कोचिंग क्लासेसच्या इमारतीतील सहाव्या मजल्यावर उडी मारून जीवनयात्रा संपविली आहे. ही दुदैवी घटना रविवारी कोटा शहरातील जवाहरनगर ( राजस्थान) भागात घडली आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मृत अविष्कार कासले याचे आई-वडील दोघेही शिक्षण विभागात कार्यरत आहेत. वडिल संभाजी कासले हे अहमदपूर तालुक्यातील थोडगा केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून तर आई नांदेड जिल्ह्य़ातील किनवट तालुक्यात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे. सध्या ते अहमदपूर शहरात वास्तव्यास आहेत. अविष्काराचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अहमदपूर शहरात झाले आहे.तो अतिशय गुणी व हुशार मुलगा होता.त्याचा भाऊ हा कोटा येथेच शिकून हैद्राबाद येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे.

अविष्कार तीन वर्षांपासून वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेसाठी एका कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षण घेत होता. क्लासेसपासून थोड्याच अंतरावर तलवंडी भागात भाड्याने घेतलेल्या खोलीत आजी – आजोबांसोबत तो राहत होता.रविवारी वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेचा सराव पेपर होता. तो पेपर अवघड गेला म्हणून त्याने हे टोकाचे दुर्दैवी पाऊल उचलले असून कोचिंग क्लासेसच्या इमारतीतील सहाव्या मजल्यावरून उडी मारून त्याने स्वतःची जीवनयात्रा संपविली आहे. त्यांच्या मुळगावी उजना ता.अहमदपूर येथे त्यांच्यावर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुदैवी घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.