
चंद्रपूर महापालिकेतील सत्ता स्थापनेवरून जिह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ट्रव्हलच्या बसने पुण्यावरून नागपूरकडे निघालेल्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांची बस समृद्धी महामार्गावर अडवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बसमधील नगरसेवकांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून चंद्रपूर की वासेपूर? असा संताप व्यक्त होऊ लागला आहे.
वडेट्टीवार समर्थक नगरसेवक बुधवारी संध्याकाळी पुण्यावरून नागपूरसाठी निघाले होते. गुरुवारी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर गणेशपूर शिवार येथे त्यांची बस पोहोचली असता अचानक 6 गाडय़ांमधून तोंडावर रुमाल बांधून आलेल्या दहा ते पंधरा लोकांनी ट्रव्हल्सची बस थांबवली. नगरसेवकांना शिवीगाळ करत आपल्या सोबत चालण्याची धमकी दिली. जर आमच्या सोबत आले नाही तर मारून टाकू असे धमकावले. त्यांना वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांच्या गटाने जोरदार प्रतिकार केला आणि एकाला पकडून ठेवले. इतर सर्व आरोपी पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पकडून ठेवलेल्या कनैन सिद्दिकी याला ताब्यात घेतले आहे.
चंद्रपूर महापालिकेत सत्तास्थापन करण्यावरून कॉँग्रेस विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील पक्षांतर्गत वाद उफाळून आला आहे. त्यातच वडेट्टीवार समर्थक नगरसेवकांची बस रस्त्यात अडवून त्यांच्या अपहरणाचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी वर्धा जिह्यातील सावंगी मेघे पोलीस ठाण्यात धानोरकर गटाचे सौरभ ठोंबरे व अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. धानोरकर यांचे कट्टर समर्थक आणि कॉँग्रेसचे पराभूत उमेदवार सोहेल शेख यांचेही नाव पोलीस तक्रारीत आले आहे.

























































