
गणेशोत्सवासाठी गावी दाखल झालेले मुंबईकर चाकरमानी दीड, पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करून मुंबईला परतीच्या प्रवासाला लागले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी गणेशभक्त गणेशोत्सवानिमित्त गावी दाखल झाले आहेत. गणेशोत्सव साजरा करून हे चाकरमानी मुंबईला परतू लागले आहेत. त्यामुळे कुडाळसह जिल्हाभरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर चाकरमानी प्रवाशांची गर्दी होत असून मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाडय़ांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोकण रेल्वेसह एसटी प्रशासनाकडून जादा गाडय़ांची व्यवस्था करण्यात आल्याने गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आता दीड आणि पाच दिवसाच्या गणपतींचे विसर्जन करून चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. कोकण रेल्वेसह एसटी प्रशासनाकडून चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी जादा गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. कुडाळ, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, कणकवली यासह जिह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर मुंबईला परतणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी होत आहे. या परतीच्या प्रवासाने मुंबईकडे जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाडय़ांमध्ये गर्दी आहे. सर्वच गाडय़ांचे तिकीट आरक्षण आधीच फुल्ल झाले आहे. जनरल बोगीतही हाऊसफुल्ल गर्दी होत आहे. खासगी गाडय़ा, आराम गाडय़ांही फुल झाल्या आहेत.
देवरुख एसटी आगाराच्या 310 बसेस धावणार
कोकणात गणेशभक्त लाखोंच्या संख्येने कोकणात येत असतात. या कोकणवासीयांची एसटीला पहिली पसंती असते. या वर्षी कोकणात दाखल झालेल्या गणेशभक्तांसाठी परतीच्या प्रवासासाठी जादा एसटी बसेस सोडणार आहे. संगमेश्वर तालुक्यातील गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी 310 बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख मधाळे यांनी दिली. देवरुख, साखरपा, संगमेश्वर, माखजन विभागातून या बसेस रवाना होणार आहेत. 2 सप्टेंबरला 21, 3 सप्टेंबरला 166, 4 सप्टेंबरला 89, 5 सप्टेंबरला 18, 6 व 7 सप्टेंबरला 8 गाडय़ा सोडण्याचे नियोजन झाले आहे. एसटी बसेसने चांगली व्यवस्था केली असली तरी सतत कोसळणाऱ्या पावसाने व मुंबई-महामार्गावरील खड्डय़ांनी कोकणवासीयांची परीक्षाच घेतली. तरीही भाविकांनी आपल्या लाडक्या गणरायांची मनोभावे सेवा केली आहे.