
सरकारकडून नियमबाह्यरीत्या ‘डय़ुटी ड्रॉबॅक’ मिळवून फसवणूक केल्याच्या आरोपावरून महसूल गुप्तचर संचालनालयाने काढलेल्या लुक आऊट नोटीसविरोधात हायकोर्टात धाव घेणाऱ्या दोघा संचालकांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. याचिकाकर्त्यांविरुद्ध कोणताही दखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही तसेच त्यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे तपासाचे कारण देऊन प्रवासाचा अधिकार हिरावता येणार नाही असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने कंपनीच्या संचालकांविरोधात काढलेली लुक आऊट नोटीस रद्द केली.
‘काका ओव्हरसीज लिमिटेड’ आणि ‘रग्सोटिक प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपन्यांचे संचालक असलेल्या दोघा याचिकाकर्त्यांवर असा आरोप आहे की, त्यांनी अमेरिकेला निर्यात केलेल्या मालाची किंमत वाढवून सांगून सरकारकडून नियमबाह्यरीत्या निर्यात प्रोत्साहन सवलत मिळवून फसवणूक केली. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरू असून महसूल गुप्तचर संचालनालयाने त्यांच्या विरोधात लुक आऊट नोटीस जारी केली होती.





























































