नगर- पाथर्डी प्रवासात साडचार लाखांची चोरी; महिलेविरोधात गुन्हा दाखल

एकलव्य शिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक शिवाजी मारुती बडे (रा. पाथर्डी) हे नगरहून पाथर्डीकडे येत असताना त्यांच्याजवळ असलेल्या बॅगेतून साडेचार लाख रुपयांची रक्कम चोरीला गेली आहे. या प्रकरणी शिवाजी बडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बडे हे नगरला प्लॅट बुक करण्यासाठी पाच लाख रुपये घेऊन गेले होते.प्लॅट मालक न भेटल्याने बडे शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पैसे घेऊन परत पाथर्डीला जाण्यासाठी नगर येथील स्टेट बँक चौकात आले. ते एका खाजगी कारमध्ये पैशाची बॅग मांडीवर घेऊन बसले.त्यांच्या शेजारी एक अनोळखी महिला आपल्या मुलासह बसली होती. बडे यांना घेण्यासाठी त्यांचा मुलगा तिसगाव येथे आपली कार घेऊन आला होता. बडे पाथर्डीला आपल्या घरी आले व शनिवारी त्यांनी बॅग उघडली असता बॅगेतील साडेचार लाख रुपयांची रोकड गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.