मनतरंग; साठीनंतरचे सहजीवन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>दिव्या नेरुरकर-सौदागर

नातेसंबंध आणि त्यातही वैवाहिक नाती ही एकदम नाजूक असतात. वैवाहिक जीवनात सुखी व्हायचे असल्यास आपल्या जोडीदाराला वेळ द्यावाच लागतो. त्यानंतरच विश्वासाचा मजबूत धागा तयार होतो. अन्यथा त्यामध्ये एक जरी गुंतागुंत झाली तरी हा धागा तुटू शकतो. म्हणूनच विश्वास, संयम आणि सुसंवाद या त्रयीने सहजीवन, विशेषत साठीनंतरचे सहजीवन सुखकारक होऊ शकते.

काही दिवसांपूर्वी मला एक कॉल आला. पलीकडून एका साधारण प्रौढ असलेल्या बाईंचा आवाज होता. अगदी मोजक्या शब्दांत त्यांनी अपॉइंटमेंट मागितली आणि ‘’ओके… मी येते… आजच…! पत्ता मला व्हॉटस्आप कराल का?” अशा विनवणीच्या स्वरातच त्यांनी विचारणा केली आणि पत्ता मिळाल्यावर ‘’थँक्स” म्हणून पुन्हा एकदा ‘’मी येते” असा रिप्लाय दिला.

दिलेल्या वेळेवर त्या क्लिनिकमध्ये आल्या. ‘’नमस्कार मॅम, मी मधुरा. मला तातडीची गरज होती म्हणून मी आलेय. समुपदेशनापेक्षाही मला कोणीतरी माझं ऐकून घेणारं हवं होतं. मी बोलेन तेव्हा मला कोणीतरी जज न करता समजून घेणारं हवं होतं. मी माझ्याबद्दल काही गोष्टी कोणालाही सांगितल्याच नाहीत. अगदी माझ्या नवऱयालासुद्धा. त्यामुळे…” मधुराताईंनी खोल श्वास घेतला.

‘’तुम्ही मनमोकळेपणाने बोलू शकता आणि जे काही सांगाल ते या खोलीबाहेर जाणार नाही याची शाश्वती मी देऊ शकते.” मधुराताईंच्या चेहऱयावर थोडं हसू आलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली.

‘’मी आता साठीला येतेय. माझ्या घरी मी आणि माझा नवरा असे दोघे राहतो. आमची मुलगी लग्न होऊन तिच्या घरी सुखाने नांदतेय. तिची मुलगी म्हणजे माझी नात लहानपणी आमच्याकडेच होती. आता तीही शाळेत जायला लागलीय. त्यामुळे आता सध्या आम्ही दोघंच असतो. 24 तास मला त्याचं तोंड बघूनच राग यायला लागलाय. सगळ्या जुन्या गोष्टी आठवायला लागल्या आहेत” असं म्हणताच त्यांच्या समुपदेशनाला येण्याचे कारण स्पष्ट झाले.

‘’मी लाडाकोडात वाढलेली एकुलती एक मुलगी. लग्न करून माणसांनी भरल्या घरी आले. त्यात माझा नवरा सगळ्यात लहान. त्याला मोठय़ा दोन बहिणी. याचे लाड भरपूर झाले. त्यामुळे जबाबदारी घेण्याचा कधी प्रश्न आला नाही. हीच सवय लग्नानंतरही होती. नोकरीत स्थिरता नव्हती, पण पैशांची कमी कधी भासली नाही. कारण तिन्ही बहिणी वेळोवेळी आम्हाला मदत करत होत्या. त्याला काही वाटलं नाही या मदतीचं पण मला ओशाळल्यासारखं होई. माझा नवरा बिनधास्त होता. नंतर मुलीचं शिक्षण आणि इतर आर्थिक गरजा वाढत गेल्या तसा मी जॉब पकडला. पण याने कधीच त्याची जाणीव ठेवली नाही. तो सतत बहिणींची आणि माझी तुलना करायचा. बहिणींना त्याची किती काळजी होती आणि मला त्याचं मन कसं कळायचं नाही… हे सगळं मला असह्य व्हायचं. मी दुर्लक्ष केलं, पण मनातून बरीच दुखावली गेले. मला आठवतंय… एकदा भांडणामध्ये हा माणूस मला पटकन बोलून गेला की, माझी त्याला गरज नाही. या बोलण्याला काही अर्थ आहे? कशाला केला संसार? हा विचार सतत हल्ली मनाला टोचणी देत असतो. मला हल्ली इतकं सगळं आठवायला लागलं आहे नं… मुलीच्या संगोपनासाठा मी नोकरी सोडली होती. तेव्हा माझी एक नणंद नोकरी करत होती. त्या वेळी तिच्याशी तुलना करत त्याने मला आळशी ठरवलं. त्याने माझ्या माहेरच्या माणसांसमोरही माझी सतत खिल्ली उडवली. हे सारे अपमान मला सतत आठवत आहेत.” असे म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली.

‘’मी हे कोणालाही सांगितलं नाही. अगदी माझ्या मुलीलाही. सगळं मनातच ठेवलंय. कदाचित म्हणून मला आता त्याचा जास्त त्रास होतोय,” त्या पुढे म्हणाल्या.

“मी झुरत राहिले आणि आताही तशीच झुरतेय,” हे वाक्य सर्रास मला समुपदेशनासाठी येणाऱया महिलांकडून ऐकायला मिळते. विशेषत प्रौढावस्थेत प्रवेश करणाऱया जोडप्यांमधील महिलांकडून ही पारवजा टोचणी नेहमीच ऐकायला मिळते. पण काही मधुराताईंसारख्या महिला अतिसंवेदनशीलपणामुळे जास्त त्रास करून घेतात आणि त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्यावरही त्याचे परिणाम दिसायला लागतात. अशा केसेसमध्ये अजून एक बाब जी बघायला मिळते ती म्हणजे या जोडप्यांमधील पुरुषांचीही एक स्वतची बाजू असते ती म्हणजे “आमची ‘ही’ इतकी वर्षं शांत का राहिली? तिने एकदा तरी सांगितलं असतं तर कदाचित…” असे सांगत पुरुष मंडळी नंतर आपल्या बायकोबद्दल जास्त संवेदनशील होतात.
मधुराताईंच्या बाबतीतसुद्धा असेच काहीसे घडले. त्यांची सत्रे चालू असतानाच अचानक एका सत्रामध्ये त्यांचे पती अनिल आले. तेव्हा त्यांनी आस्थेने मधुराताईंबाबत चौकशी केली. बोलता बोलता त्यांनी स्वतकडून झालेल्या चुकांबाबत मधुराताईंची माफीही मागितली. ‘’आता उपयोग काय? आपले गेलेले दिवस परत येणार आहेत का?” असा जळजळीत कटाक्ष त्यांनी टाकताच अनिल गप्प झाले.

‘’गेलेले दिवस नाही येणार, पण तुम्ही दोघं आताही नवीन सुरुवात करू शकाल का? कारण कडू आठवणी पुसून टाकण्यासाठी नवीन आठवणींची सुरुवात तुम्हालाच करायची आहे,” असे त्यांना सांगताच अनिल यांनी या तोडग्याला मूक संमती दिली. परंतु मधुराताई विचारात पडल्या आणि म्हणाल्या, “मला हे सहजासहजी तरी शक्य होणार नाही. मला अजून थोडा वेळ हवाय. त्यासाठी मी काही वैयक्तिक सत्रे घेईन.” अनिल त्याला तयार होतेच.

नंतर त्या दोघांचीही वैयक्तिक सत्रे घेतली गेली. त्यामध्ये अनिल यांना मधुराताईंच्या कधीतरी येऊ शकणाऱया रागासाठी तयार करण्यात आले, ज्यायोगे मधुराताई मोकळ्या होतील. मधुराताईंनाही होऊन गेलेल्या भूतकाळात न रमता वर्तमान आणि भविष्याचा विचार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत होते. अर्थात त्यांच्या सत्रांमध्ये त्या त्यांच्या नकारात्मक विचार आणि भावनांवर काम करतच होत्या. थोडक्यात सांगायचे झाले तर दोघेही येणाऱया साठीनंतरच्या सहजीवनाची तयारी करत होते.

नातेसंबंध आणि त्यातही वैवाहिक नाती ही एकदम नाजूक असतात. वैवाहिक जीवनात सुखी व्हायचे असल्यास आपल्या जोडीदाराला वेळ द्यावाच लागतो. त्यानंतरच विश्वासाचा मजबूत धागा तयार होतो. अन्यथा त्यामध्ये एक जरी गुंतागुंत झाली तरी हा धागा तुटू शकतो. म्हणूनच विश्वास, संयम आणि सुसंवाद या त्रयीने सहजीवन, विशेषत साठीनंतरचे सहजीवन सुखकारक होऊ शकते.

– [email protected]
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)