
शहरात ड्रग्जची तस्करी करताना रंगेहाथ पकडले गेलेल्या दोघा तस्करांना सत्र न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आाधारे चांगलाच दणका दिला आहे. दोघा ड्रग्ज तस्करांना न्यायालयाने 20 वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने वर्ष 2017 मध्ये छेडानगर येथे प्रवीण वाघेला (34) या ड्रग्ज तस्कराला पकडले होते. त्यावेळी त्याच्याजवळ दोन कोटी चार लाख रुपये किंमतीचा 10 किलो 200 ग्रॅम एमडी आणि सात लाख रुपये किमतीची कार मिळून आली होती. वाघेला याने चौकशीत तो कर्नाटकातील रामदास नायक याच्या केमिकल प्लांटमध्ये एमडी ड्रग्ज बनवीत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार छापा टाकून एक कोटी 40 लाख रुपये किमतीचा एमडीचा साठा जप्त केला होता. तसेच फिरदोस रज्जाक नाथाणी ऊर्फ फिरोज या मित्रासोबत एमडी तस्करी करीत असल्याचे वाघेला याने सांगितल्यानंतर फिरोजलादेखील पकडण्यात आले होते.



























































