
>> श्रीकांत आंब्रे
अनेक विषयांवर चिकित्सक लेखन करणारे ज्येष्ठ लेखक प्रतीक राजूरकर यांचे ‘गुप्तहेरांच्या निवडक सत्यकथा’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःची ओळख पुसून आपल्या राष्ट्रासाठी शत्रू राष्ट्रात हेरगिरी करणाऱया जागतिक पातळीवर गाजलेल्या हेरांच्या थरारक सत्यकथा या पुस्तकात आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी, देशविरोधी कटांचा छडा लावण्यासाठी प्रत्येक देशाचे गुप्तहेर शत्रू राष्ट्रात कार्यरत असतात. त्यांच्या काही मोहिमा अयशस्वी ठरल्या तर तुरंगवास अथवा मृत्युदंडाची शिक्षा अटळ असते, परंतु देशहितासाठी जीवावर उदार झालेले अनेक देशभक्त हे अग्निदिव्य करण्यास तयार असतात. यशाचे शिल्पकार असूनही त्यांची नावे कधी उघड केली जात नाहीत. मोजक्याच लष्करी अधिकाऱयांना त्यांची नावे ठाऊक असतात. त्यांची हेरगिरीची कामगिरी संपल्यावर चार-पाच दशकांनंतर त्यांच्या पराक्रमाच्या, धाडसाच्या कहाण्या उजेडात येतात. स्वतःची ओळख लपवून देशासाठी त्याग करण्याच्या त्यांच्या कामगिरीला अनन्यसाधारण महत्त्व कसे असते हे देशोदेशीच्या गुप्तहेरांच्या निवडक सत्यकथांमधून लेखकाने अधोरेखित केले आहे. हेरगिरी करताना आपले दुहेरी व्यक्तिमत्त्व जपून कामगिरी करणाऱया गुप्तहेरांची मानसिकता हा लेखकाच्या दृष्टीने संशोधनाचा विषय असल्यामुळे गूढ आणि रहस्यमय आयुष्य जगणाऱया गुप्तहेरांच्या विश्वाचा त्यांनी आत्मीयतेने शोध घेतला आणि त्यातूनच हे पुस्तक आकारास आले आहे.
यात कधी जर्मनीची तर कधी फ्रान्सची गुप्तहेर म्हणून काम करणारी सौंदर्यवती व मादक नृत्यांगना माताहारी शत्रूच्या हाती सापडल्यावर तिला झालेल्या मृत्युदंडाच्या भयानक शिक्षेला ती कशी बेडरपणे सामोरी जाते याचे थरारक वर्णन प्रत्यक्ष ती सत्यकथा वाचल्यावरच कळेल. अपंगत्वावर मात करणारी अमेरिकेची गुप्तहेर व्हर्जिनिया हाल, दुसऱया महायुद्धात इंग्रजी आणि संयुक्त राष्ट्र संघाच्या सैन्यासाठी हेरगिरी करणारी भारतीय वंशाची नूर इनायत खान, चर्चिलच्या आवडत्या आणि लाडक्या गुप्तहेर क्रिस्टिनी ग्रानविली, ओडेट सानसम, वेरा आटकिन्स यांना ज्या छळाला सामोरे जावे लागले, मरणयातना भोगाव्या लागल्या त्याची कल्पनाच केलेली बरी. नाझी वेषातला कम्युनिस्ट गुप्तहेर रिचर्ड सोर्ज, रशियासाठी हेरगिरी करणारे केंब्रिज विद्यापीठातील पाच कम्युनिस्ट विद्यार्थ्यांचे टोळके, वामपंथी गुप्तहेर जार्ज बेक, मानहटन या गाजलेल्या योजनेतील अणुबाम्ब पळविणारे रशियन गुप्तहेर, इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेने इथिओपियातील ज्यू नागरिकांचे सुदानमार्गे इस्रायलमध्ये पुनर्वसन करण्यासाठी राबवलेली गुप्तहेरांची पर्यटन मोहीम, रा या भारतातील गुप्तहेर संघटनेचे जाळे विणणारे रामेश्वरनाथ काव यांची बांगलादेश निर्मितीत आणि सिक्कीमच्या भारतातील प्रवेशामधील मोलाची कामगिरी, शी पे पु नावाच्या चीनच्या सव्वीस वर्षीय कलावंत गुप्तहेराच्या जीवनाची गूढ कथा, माजी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या गार्डन लिट्टी या निष्ठावंत गुप्तहेराने आपल्या धन्याशी राखलेल्या इमानाची कहाणी, हेरगिरी क्षेत्रातील प्राण्यांची, पक्ष्यांची कामगिरी, बलाढय़ राजकीय नेत्यांच्या सुरक्षा यंत्रणेचे इंगित, गुप्तहेरांच्या स्मृतींना उजाळा देणारे सीआयएचे अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील संग्रहालय इत्यादी लेख माहितीपूर्ण आणि वाचनीय आहेत. लेखकाने संदर्भासाठी तत्कालीन पत्रकार, सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी तसेच इतर माहिती परिश्रमपूर्वक मिळविली आहे. काही गुप्तहेरांच्या जीवनावर आजपर्यंत अनेक चित्रपटही प्रदर्शित झाले आहेत. त्यांची वैशिष्टय़ेही लेखकाने सांगितली आहेत. गुप्तहेरांच्या या सत्यकथा रहस्य कथांइतक्याच उत्कंठामय आहेत. श्रीकृष्ण ढोरे यांचे मुखपृष्ठही साजेसे आहे. ‘मार्मिक’ व्यंगचित्र साप्ताहिकाचे दिवंगत कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच हे लेख आपण लिहू शकलो, असे प्रतीक राजूरकर यांनी म्हटले आहे, तसेच हे पुस्तकही त्यांनी पंढरीनाथ सावंत यांच्या स्मृतींना अर्पण केले आहे.
गुप्तहेरांच्या निवडक सत्यकथा
लेखक ः प्रतीक राजूरकर
प्रकाशक ः विघ्नेश पुस्तक भांडार, कणकवली
पृष्ठे ः 240, मूल्य ः 530 रुपये.