जग धोक्याच्या उंबरठ्यावर; पण लक्ष कोण देतो? कुमार केतकर यांनी व्यक्त केली खंत

488

जगासमोर आज एक नव्हे, तर अनेक आव्हाने आ वासून उभा आहेत. युद्धखोरी, एकमेकांविरोधातील द्वेषभावना, ग्लोबल वार्मिंग अशा विविध आव्हानांचा मानवी जीवनावर काय परिणाम होणार, नैसर्गिक असमतोल कसा बिघडत चालला आहे हे आपण पाहतोय, ते आपल्या समजतेय. तरीही त्याकडे आम्हा सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी व्यक्त केली.

सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार एकनाथ ठाकूर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सारस्वत बँकेच्या वतीने आज दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात ‘21 वे शतक आणि नव्या जगासमोरील आव्हाने’ या विषयावर कुमार केतकर यांचे व्याखान आयोजित केले होते, त्याप्रसंगी केतकर बोलत होते. 21 व्या शतकात जगासमोर क्लायमेट चेंजचे मोठे आव्हान आहे. ऋतुचक्रात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे पुढील चार-पाच दशकांत जगाचे अनेक भूभाग पाण्याखाली जातील असा इशारा अभ्यासक देत आहेत. मालदीव हा दोन हजार बेटांचा देश आहे. पुढील पन्नास वर्षांत आमची जवळपास आठशे बेट पाण्याखाली जातील असे त्यांच्या सरकारने स्पष्ट केले आहे. हीच परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण होणार असल्याचे विविध अभ्यासकांचे मत असल्याचे केतकर यांनी सांगितले. गेल्या पाच दशकांत जगाच्या पाठीवर अनेक भयानक घटना घडल्या. जगासमोर अनेक आव्हाने आहेत. मात्र त्यावर फारशा उपाययोजना होत नसल्याचे ते म्हणाले. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, बँकेचे उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने आदी उपस्थित होते.

तंत्रज्ञानाचे राज्य आहे की काय!

सध्याची आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यास आपल्याकर तंत्रज्ञानाचे राज्य आहे की काय अशी शंका येते. आपल्यावर तंत्रज्ञानाचा प्रभाव अधिक असल्याचे मत कुमार केतकर यांनी व्यक्त केले. ज्या काळात मीडिया प्रभावी नव्हता, संवादांची माध्यमे नव्हती त्या काळात महात्मा गांधी यांची ख्याती जगभर पसरली होती असे त्यांनी सांगितले. आज मीडिया इतका वाढलाय की, त्याचा परिणाम आपल्या मानसिक, राजकीय, धार्मिक, सामाजिक मनावर झाला असल्याचेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या