
आपल्या विविध मागण्यांसाठी रंगकर्मी उद्या सोमवार, 9 ऑगस्ट रोजी आंदोलन करणार आहेत. हिंदमाता सिनेमागृहासमोर चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याजवळ रंगकर्मी जमणार आहेत. यावेळी सर्व कलाकार ‘जागर रंगकर्मींचा’ हा कार्यक्रम सादर करून आपल्या मागण्या मांडतील.
देशात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून रंगकर्मींचा रोजगार हिरावला गेला आहे. गेल्या सक्वा वर्षापासून असंख्य कलावंतांचे काम थांबले आहे. याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून अभिनेते विजय पाटकर, विजय राणे, संचित यादव यांच्या नेतृत्वाखाली रंगकर्मी एकवटले आहेत. यामध्ये निर्मात्यांसह विविध लोककलावंत, पारंपरिक रंगकर्मी, चित्रपट, नाटय़, मालिकांमधील कलाकार, हिंदी-मराठी वाद्यवृंदातील वादक, गायक, निर्माते, शाहीर, तमासगीर, ढोल-ताशे, बेंजो पार्टी, बुकिंग क्लार्क, व्यवस्थापक, नाटय़ वितरक, रंगमंच कामगार आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील 35 जिह्यांत प्रथमच एकाचवेळी सोमवारी आंदोलन छेडले जाणार आहे. हे आंदोलन राजकारण आणि संस्थाविरहित आहे. कलाकारांनी कलाकारांसाठी सुरू केलेले हे आंदोलन आहे, अशी माहिती विजय पाटकर यांनी दिली.


























































