
टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या शूटींगला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर सुरक्षेची काळजी घेऊन नाट्यगृहे खुली व्हावीत, अशी रंगकर्मी- निर्मात्यांची अपेक्षा आहे. त्यासाठी मराठी नाट्य व्यवसायाशी संबंधित घटक संस्था नाट्य परिषदेमार्फत सरकारला सुरक्षिततेच्या नियमावली संदर्भात निवेदन सादर करणार आहेत.
नाट्यगृहे खुली करण्यासाठी कलाकार, रंगमंच कामगार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती व्यवस्था- नियमावली असावी, यासाठी नुकतीच मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघाच्या पुढाकाराने बैठक झाली. या बैठकीला मराठी नाटक कलाकार संघ, मुंबईचे अध्यक्ष प्रदीप कबरे, प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार, रंगमंच कामगार संघ, मुंबईचे प्रवक्ते रत्नाकर जगताप, कोषाध्यक्ष संदीप नगरकर, नाट्य व्यवस्थापक संघ मुंबईचे अध्यश्र प्रभाकर उर्फ गोट्या सावंत, निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव, प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे, सहकार्यवाह सुशील आंबेकर उपस्थित होते. या बैठकीत नाट्यगृहांचा पडदा उघडण्याबरोबरच नाट्यव्यवसायाच्या अर्थसहाय्य योजनेवर चर्चा झाली.
नाट्य व्यवसायावर 20 हजारांहून अधिक कलावंत, रंगकर्मी, रंगमंच कामगार, तंत्रज्ञ अवलंबून आहेत. नाट्यगृहे बंद असल्यामुळे सार्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. या परिस्थितीला हिंमतीने सामोरे जावे लागेल. त्यासाठी नाट्य निर्माते म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. सरकारने सुरक्षिततेची नियमावली ठरवावी आणि मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा आहे. – संतोष काणेकर, अध्यक्ष, नाट्य व्यावसायिक निर्माता संघ.
रंगकर्मींच्या कायमस्वरूपी मदतीसाठी नाट्यकर्मी कल्याण केंद्र
लॉकडाऊनचा मोठा फटका नाट्यसृष्टीला बसला. मार्च महिन्यापासून नाट्यगृहे बंद आहेत. यामुळे रंगकर्मी, रंगमंच कामगार, तंत्रज्ञ आदी नाटय व्यवसायावर अवलंबून असणारे अनेक जण मोठ्या अडचणीत आहेत. याकाळात नाट्य परिषदेतर्फे रंगकर्मींना मदत करण्यात येत आहे. पण तात्पुरती मदत न करता कायमस्वरूपी मदतीचा प्रवाह राखता यावा, म्हणून आता नाट्यपरिषदेने नाट्यकर्मी कल्याण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
मार्चपासून नाट्यव्यवसाय ठप्प आहे, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी नाट्य परिषदेने नाट्यकर्मी मदत निधी उभा करण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजी घेतला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून नाट्यपरिषदेने अडचणीत असलेले रंगकर्मी आणि रंगमंच कामगार आदींना एक कोटी 20 लाखांची मदत केली. याशिवाय गेले पाच महिने रंगमंच कामगार, निर्माते, कलाकार या सर्वच गरजूंना अन्नधान्याची किटस देण्यात येत आहेत. आताही गोदरेज कंझ्युमर्स यांच्याकडून आलेली किटस जवळपास हजार ते बाराशे जणांना वितरीत करण्यात येत आहेत. गरजू नाट्यकर्मींना 18 ते 20 ऑगस्ट या काळात हे वाटप करण्यात आले. नाट्यपरिषदेचे अध्ययक्ष प्रसाद कांबळी, निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष काणेकर, कलाकार संघाचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांसह रंगमंच कामगार संघाचे रत्नकांत जगताप, व्यवस्थापक संघाचे गोट्या सावंत तसेच आशुतोष गोखले, सुमित गाडे यांच्या विशेष प्रयत्नाने ही किट्सची मदत मिळाली आहे.
गरजू रंगकर्मींना तात्पुरती मदत न करता कायमस्वरुपी मदतीचा ओघ रहावा, यासाठी नाट्यकर्मी कल्याण केंद्राची स्थापना नाट्यपरिषद करणार आहे. यातून रंगकर्मींच्या आरोग्य विषयक तक्रारी, अडचणीत आलेले कलाकार आदींना मदत होऊ शकेल. याबाबत आमचं एकमत झालं आहे.- मंगेश कदम, प्रवक्ते



























































