
परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या गोदाकाठच्या धनगर टाकळी येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी एका घरात चोरी करून सव्वा लाखांचा ऐवज लांबवला आहे.
चुडावा पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या धनगर टाकळी येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर तक्रारदार भीमराव मारुती खाडे (रा. धनगर टाकळी) यांच्या घरी अज्ञात चोरांनी घुसून त्यांच्या मुलाच्या खिशातील कपाटाच्या चाव्या घेतल्या. त्यांच्या राहत्या रूममधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सोन्या-दागिने 2 तोळ्याचे गंठण, एक तोळ्याची एकदानी आणि इतर दागिने असा एकूण एक लाख रुपयांचा ऐवज व नगदी 15 हजार रुपये असा एकूण एक लाख 14 हजार 700 रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
आपल्या घरी चोरी झाल्याचे समजताच भिमराव खाडे यांनी या घटनेची माहिती चुडावा पोलिसांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णा कर्डीले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी देवकते, फौजदार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.





















































