
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर एसटी स्टँडसमोर उभ्या असलेल्या एका महिलेच्या हातातील 15 हजार रुपयांची पिशवी धूम स्टाईलने पळविण्यात आली. ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली.
सावित्रीबाई जगन्नाथ गायकवाड (रा.पढेगाव) यांचे पती जगन्नाथ गायकवाड यांनी श्रीरामपूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून 15 हजार रुपये काढले होते. पैसे पिशवीत ठेवून सावित्रीबाई गायकवाड व त्यांचे पती जगन्नाथ गायकवाड दुचाकीवरून पढेगावला निघाले होते. बेलापूर एसटी स्टँण्डजवळ ते केळी घेण्यासाठी थांबले होते.
त्यावेळी दुचाकीहून आलेल्या चोरट्यांनी सावित्रीबाई यांच्या हातात असलेली पैशांची पिशवी पळविली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून चोरांचा शोध घेण्यात येत आहे. चोरटे श्रीरामपूरपासून गायकवाड यांचा पाठलाग करत होते. त्यानंतर हे दोघे केळी घेण्यासाठी थांबल्याची संधी साधत चोरट्यांनी पैशांची पिशवी हिसकावून पळ काढला आहे.































































