तुतारी एक्स्प्रेस चोरटय़ांच्या ‘हिटलिस्ट’वर

कोकण मार्गावर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याचे सत्र पुन्हा सुरू झाल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोकण मार्गावरून धावणारी तुतारी एक्स्प्रेस चोरटय़ांच्या ‘हिटलिस्ट’वर आहे. मुंबईहून कोकणात येणारी तुतारी एक्स्प्रेस पहाटेच्या सुमारास क्रॉसिंगसाठी दिवाणखवटी रेल्वे स्थानकाजवळ थांबते. याचदरम्यान प्रवासी गाढ झोपेत असतात. हीच संधी साधत चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा करतात.

दोनच दिवसांपूर्वी सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी चोरटय़ांनी हिसकावत पुन्हा यंत्रणांना चकवा देण्याचा प्रयत्न केला आहे. तुतारी एक्स्प्रेसमध्ये सर्रासपणे घडणाऱ्या चोरीच्या घटनांनी तपास यंत्रणा सतर्क झाल्याची शक्यता गृहीत धरत लक्ष विचलित करण्यासाठीच सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेसला ‘टार्गेट’ करत महिलांच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला जात असल्याचे स्पष्ट आहे.