‘आयपीएल’मध्ये येणार दोन नवे संघ; वर्षाअखेरीस होणार या टी-20 लीगचा मेगा लिलाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेट विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आता दोन नव्या संघांची भर पडणार आहे. ‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’च्या 15व्या हंगामासाठी ब्लू प्रिंट तयार केली असून यात नव्या संघांबरोबरच रिटेशन, क्रिकेटपटूंचा लिलाव, खेळाडूंचा पगार आणि माध्यम हक्कांसाठीच्या निविदांचा समावेश आहे. नव्या दोन संघांसाठीची निविदा ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात येईल. ही प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्ये आयपीएलच्या मेगा लिलावाचे आयोजन करण्याची तयारी सुरू झाली आहे.

डिसेंबरमध्ये होणार मेगा लिलाव

बीसीसीआय डिसेंबरमध्ये आयपीएल मेगा ऑक्शन करू शकते. म्हणजेच खेळाडूंचा नव्याने लिलाव केला जाईल. सर्व संघ 4 खेळाडू ठेवू शकतील. पण यासाठी अट ठेवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये एक परदेशी किंवा दोन देशांतर्गत व दोन परदेशी खेळाडू असणे आवश्यक आहे.

नव्या संघांची बेस प्राईज

आयपीएलमध्ये दोन संघ वाढणार म्हणजे ‘बीसीसीआय’च्या गंगाजळीत वाढ होणार आहे. नव्या संघांसाठी बेस प्राईज काय ठेवायची हे अद्यापि ठरले नाही. मात्र ही बेस प्राईज 2 हजार कोटी रुपयांच्या आसपास असणार आहे. गोएंका ग्रुप आणि अदानी ग्रुप आयपीएल संघ खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. शिवाय अरबिंदो फार्मा लिमिटेड आणि टोरेंट ग्रुप यांनीही नवे संघ खरेदी करण्यात रस दाखविलेला आहे. दोन नवीन संघांच्या समावेशानंतर सामन्यांची संख्याही 15 ते 30 सामन्यांनी वाढणार आहे.

फ्रेंचायझींची पर्स सॅलरी वाढणार

बीसीसीआय फ्रेंचायझींची पर्स सॅलरी वाढविण्याची तयारी करीत आहे. ही पर्स सॅलरी 85 कोटींवरून 90 कोटी करण्यात येणार आहे. पुढील तीन वर्षे म्हणजे 2024 हंगामापर्यंत ती 100 कोटींपर्यंत वाढविण्यात येईल. प्रेंचायझीला पर्स सॅलरीच्या किमान 75 टक्के खर्च करणे बंधनकारक असेल.

खेळाडू रिटेन नियमातही बदल होणार?

‘आयपीएल’मध्ये क्रिकेटपटूंना रिटेन करण्याच्या नियमातही बीसीसीआय काही बदल करण्याची शक्यता आहे. प्रत्येक संघाला चार खेळाडू ठेवता येतील. प्रेंचायझी तीन देशी आणि एक परदेशी खेळाडू किंवा दोन देशी आणि दोन परदेशी खेळाडू राखू शकते. तीन खेळाडू राखल्यास प्रेंचायझीची पर्स सॅलरी 15 कोटी, 11 कोटी आणि 7 कोटी रुपयांनी कमी होईल. दोन खेळाडू कायम ठेवल्यास पर्स सॅलरीमधून 12.5 कोटी आणि 8.5 कोटी कमी होतील. मात्र एकच खेळाडू कायम ठेवला तर 12.5 कोटींची कपात होईल.

50 नवीन खेळाडूंना संधी

‘आयपीएल’च्या एका संघात जास्तीत जास्त 25 क्रिकेटपटू ठेवता येतात. अशा परिस्थितीत दोन नवीन संघांच्या समावेशासह टी-20 लीगमध्ये जास्तीत जास्त 50 नवीन खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. एका संघात जास्तीत जास्त 8 परदेशी खेळाडू असू शकतात. अशा परिस्थितीत 34 देशांतर्गत आणि 16 परदेशी खेळाडू नव्या प्रेंचायझीचा भाग बनू शकतात.