‘ही’ आहेत कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट Omicron ची लक्षणे, निष्काळजीपणा जीवावर बेतणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’मुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच आता या नवीन व्हेरिएंटचा शोध लावणाऱ्या डॉक्टरांनी याच्या लक्षणांबद्दल काही माहिती जाहीर केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील या डॉक्टरांनी सांगितलं आहे की, ओमायक्रॉन (Omicron) व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वेगळीच लक्षण दिसून आली आहेत. यात अंगदुखी आणि डोकेदुखी सारखे सामान्य लक्षणे दिसून आले आहेत.

ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शोध लावणाऱ्या दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अँजेलिक कोएत्झी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की, त्यांच्या रुग्णालयात 7 असे रुग्ण आले होते, ज्यांच्यात डेल्टा व्हेरिएंटचे सामान्य लक्षणे होती. त्यांना अंगदुखी आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. या नवीन व्हेरिएंटची लक्षणे ही सामान्य तापासारखीच असल्याचं डॉ.कोएत्झी यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, मागील 8 ते 10 आठवडे येथे कोरोनाचे एकही प्रकरण समोर आलेले नव्हते. मात्र 18 नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे काही रुग्ण आले. ज्यांची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्याच्याकडे दररोज असे रुग्ण येऊ लागले ज्यांच्यात एकसारखीच कोरोनाची लक्षणे आढळून आली.

रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही – डॉ.कोएत्झी

ओमायक्रॉन व्हेरिएंटबद्दल बोलताना डॉ.कोएत्झी म्हणल्या आहेत की, ज्यांच्यात सौम्य लक्षणे आहेत त्यांना रुग्णालयात दाखल होण्याची आवश्यकता नाही. अशे रुग्ण घरी राहूनही उपचार घेऊ शकतात. त्या म्हणाल्या की, डेल्टा व्हेरिएंटच्या उलट ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये वेगवेगळे लक्षणे दिसून आले आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णाची जिभेची चव उडाली नाही. तसेच त्यांचे ऑक्सिजन लेव्हल ही कमी झाले नाही. मात्र डेल्टा (Corona Delta Variant) व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये हे दोन्ही लक्षणे दिसून येतात.

डॉ.कोएत्झी पुढे म्हणाल्या की, त्यांच्याकडे आलेल्या बहुतांश रुग्णाचे वय हे 40 वर्षांपेक्षा जास्त होते. यातील अर्ध्या रुग्णांनी कोरोनाची लस घेतली नव्हती. ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांना एक ते दोन दिवस थकवा जाणवतो. तसेच त्यांना अंगदुखी आणि डोकेदुखी सारखे त्रास जाणवतात. दरम्यान, कोरोनाचा हा नवीन व्हेरिएंट मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. याला आधी B.1.1529 असे नाव देण्यात आले होते. मात्र नंतर याचे नाव बदलून ओमायक्रॉन असे ठेवण्यात आले. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा नवीन व्हेरिएंट चिंताजनक असल्याचे घोषित केले आहे.