
घरफोडी करणाऱ्या सराईतासह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 3 लाख 40 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सराईत शाहरूख विजय पवार (रा. आटपाडी, सांगली) आणि सोनार प्रकाश रावसाहेब काकडे (रा. आटपाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडकीत घरफोडी करून चोरट्यांनी दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू महानोर तपास करीत होते. त्यावेळी संबंधित घरफोडी शाहरूख पवार याने केल्याची माहिती हवालदार नितीन गायकवाड, सुनील नागलोत यांना मिळाली. त्यानुसार पथकाने पोलिसांनी शाहरूखला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने चोरी करून सोनार प्रकाश काकडे यांना दागिने विकल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर, अमित साळुंखे, श्रीनाथ जाधव, संभाजी देवीकर, बाजीराव वीर, निखील पवार, शैलेश कुदळे, राजेश दराडे, दिगंबर साळुंके यांनी केली.




























































