
हॉटेलमधून जेवण आणण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीस्वाराला माराहण करून त्याच्याकडील सोनसाखळी आणि अंगठ्या असा 70 हजारांचा ऐवज लुटून नेल्याची घटना हडपसर भागात घडली. याबाबत तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदार तरूण रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हडपसर भागातील हॉटेलमधून जेवण आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी सातववाडी पीएमपीएल थांब्याजवळ दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना मारहाण करून गळ्यातील सोनसाखळी आणि दोन अंगठ्या हिसकावत चोरटे पसार झाले. घाबरलेल्या तरूणाने पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात अधिक तपास करत आहेत. दरम्यान, शहरात काही दिवसांपासून पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना धमकावून ऐवज लुटण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याशिवाय पादचारी नागरिकांचे मोबाइल हिसकावण्याच्या घटनाही वाढल्या आहेत.


























































