चोरट्यांनी हद्द केली, चालू ट्रान्सफॉर्मरमधून ऑईल; तांब्याची कॉईल चोरली

खालापूर गावातील कुंठेबाग येथे चोरट्यांनी हद्द केली आहे. महावितरणचा वीज प्रवाह चालू असलेल्या ट्रान्सफॉर्मरमधून चक्क ऑईल व तांब्याच्या कॉईलची चोरी केली. याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्यांनी 90 हजार रुपये किमतीचे 100 किलो तांबे व 160 लिटर ऑईल चोरी केले आहे.

कुंठेबाग येथे वीज कंपनीचे ट्रान्सफॉर्मर बसवले असून येथूनच या परिसरात विजेचा पुरवठा होतो. १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री परिसराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरकडे धाव घेतली. कर्मचाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरची तपासणी केली असता ऑईल व तांब्याची कॉईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. याची माहिती तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सहाय्यक अभियंता प्रवीण शेटगे यांना दिली. यानंतर शेटगे यांनी तत्काळ खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या चोरीचा तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत.