अजबच! अडीच लाखांच्या टोमॅटोवर चोरटय़ांचा डल्ला

सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. बाजारात टोमॅटोचा भाव 120 रुपये प्रति किलो इतका झाला आहे. अशातच टोमॅटोची चोरी झाल्याची अजब घटना कर्नाटक राज्यातील हासन जिह्यात उघडकीस आली आहे. गावात चोरटय़ांनी चक्क टोमॅटोवर डल्ला मारला आहे.

महिला शेतकरी धारणी यांनी टोमॅटोचे पीक चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. धारणी यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी दोन एकर शेतजमिनीवर टोमॅटोचे पीक घेतले होते. पीक घेण्यासाठी त्यांनी मोठी मेहनत घेतली. कर्जदेखील घेतले होते. यंदा टोमॅटोचे पीक चांगले आले होते. तसेच बाजारात भावदेखील चांगला मिळत होता. त्यामुळे टोमॅटो विकून कर्ज फेडायचे त्यांचे नियोजन होते. मात्र 4 जुलै रोजी त्यांच्या शेतातून 50 ते 60 पोती टोमॅटो चोरीला गेले. एवढेच नव्हे तर चोरटय़ांनी उरलेले पीक नष्ट केले. याप्रकरणी हलेबिड्ड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.