कराड शहरातील तिसरी टोळी तडीपार; पोलिसांची कारवाई

कराड शहरातील मलकापूर भागातील जुनेद शेख व अमीर शेख यांच्या टोळीचे चार सदस्य पोलीस अधीक्षक तथा हद्द पार प्राधिकरण सातारा यांनी दोन वर्षाकरता सातारा जिल्ह्यातून व सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

मलकापूर भागातील जुनेद शेख व अमीर शेख हे दोन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या तुरुंगात आहेत. ही गुन्हेगारांची टोळी अशिष पडळकर, अनिकेत शेलार, इंद्रजीत पवार, सुदर्शन चोरगे चालवत होते. त्यांनी कराड शहरामध्ये दहशत निर्माण करून गुन्हेगारी सुरू ठेवल्याने टोळी तडीपार होण्याकरता कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी हद्दपार प्राधिकार तथा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सुनावणी घेऊन सदर चार जणांना सातारा जिल्ह्यातून व सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केले आहे.

कराड शहर पोलीस ठाण्याकडून शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. यापूर्वी सोळवंडे गँग व झेंडे गँग हद्दपार करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी सपोनि विजय गोडसे, पोलीस हवालदार नितीन येळवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल गाडे, विनोद कदम, पोलीस नाईक तानाजी शिंदे, संजय जाधव असे पथकाने याबाबतचे कामकाज पाहिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या