अंधेरीत तृतीयपंथीयाची रेल्वेच्या गार्डला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलच्या डब्यांमध्ये प्रवाशांकडून पैसे उकळणाऱया तृतीयपंथीयांची मजल आता पैशांसाठी प्रवाशांसह रेल्वेच्या अधिकाऱयांनाही मारहाण करण्यापर्यंत पोहचली आहे. अंधेरी स्थानकात पश्चिम रेल्वेच्या एका गार्डला तृतीयपंथीयाने मारहाण करून लोहमार्ग पोलिसांच्या डोळ्यांसमोरून आरामात पलायन केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे.

अंधेरी रनिंग रूममधून भल्यापहाटे लोकलवर डय़ुटी बजावण्यासाठी गार्ड एस. बी. शिंदे जात असताना त्यांच्या मार्गात एक तृतीयपंथीय रॉबरी करण्याच्या बहाण्याने आडवा आला. शिंदे यांनी त्याला आपण रेल्वेचे गार्ड असून डय़ुटी बजावण्यासाठी जात असल्याचे सांगत बाजूला होण्यास सांगितले. तरीही या तृतीयपंथीयाने त्यांच्या चेहऱयावर जोरदार ठोसा लगावत तेथून पळ काढला. यावेळी तेथे जीआरपीचे पोलीस उपस्थित असूनही त्याने दुर्लक्ष करीत त्याचा पाठलाग करणे टाळल्याचे शिंदे यांनी अंधेरी स्टेशन मास्तरांना सांगितले.

सदर तृतीयपंथी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर रॉबरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. तरीही लोहमार्ग पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी तत्परता न दाखविल्याची तक्रार शिंदे यांनी स्टेशन मास्तरांना केली. स्टेशन मास्तरांनीही आपण हतबल असल्याचे सांगितले. त्यामुळे गार्ड शिंदे हे ‘एफआयआर’ दाखल न करताच लोकलच्या डय़ुटीवर रवाना झाले.