चार दिवसांत तिसरा तलाव ‘ओव्हर फ्लो’, सात तलावांत एप्रिलअखेरपर्यंत पुरणारा पाणीसाठा जमा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलाव क्षेत्रात सध्या जोरदार पाऊस सुरू असून गेल्या चार दिवसांत तिसरा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे. आज सायंकाळी 5.45 वाजता तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला. सद्यस्थितीत सातही तलावांत मिळून 1138097 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणीसाठा पाहता हे पाणी पुढील नऊ महिन्यांसाठी म्हणजेच एप्रिल 2023 अखेरपर्यंत पुरणारे आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही वर्षांत जून कोरडा जात असल्यामुळे मुंबईकरांवर 10 ते 15 टक्क्यांपर्यंत पाणीकपातीचे संकट ओढवत आहे. या वर्षीदेखील 27 जूनपासून 10 टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत असल्याने तलावांत 25 टक्के पाणी जमा झाल्यानंतर 12 दिवसांतच पाणीकपात मागे घेण्यात आली. तलाव क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने विहार, मोडक सागरनंतर आज तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला.

तलावांतील पाणीसाठा
अप्पर वैतरणा – 1,51,699 दशलक्ष लिटर
मोडक सागर – 1,28,925 दशलक्ष लिटर
तानसा – 1,43,887 दशलक्ष लिटर
मध्य वैतरणा – 1,57,818 दशलक्ष लिटर
भातसा – 5,29,494 दशलक्ष लिटर
विहार – 18,313 दशलक्ष लिटर
तुळशी – 7961 दशलक्ष लिटर

तीन वर्षांतील 16 जुलैचा पाणीसाठा
2022 1138097 द.लि. (78.63 टक्के)
2021 2,49,459 द.लि. (17.24 टक्के)
2020 3,73,467 द.लि. (25.80 टक्के)