आजपासून तिसरी कसोटी; इंग्लंड मालिका विजयासाठी सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नॉटिंगहॅम

पहिल्या दोन कसोटी सामन्यांत लाजिरवाण्या पराभवाला सामोरा गेलेला हिंदुस्थानी संघ उद्यापासून सुरू होणाऱया तिसऱया कसोटीत मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठीच मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीच्या ब्रिगेडसाठी उद्यापासून सुरू होणारा सामना हा ‘करो या मरो’ असाच असणार आहे. मात्र यजमान इंग्लंडचा संघ तिसरी कसोटी जिंकून मालिका खिशात टाकण्यासाठी जिवाचे रान करताना दिसेल.

पंतला मिळणार संधी

दिनेश कार्तिकला आतापर्यंत झालेल्या दोन कसोटींत सपशेल अपयशाचा सामना करावा लागलाय. त्याला चार डावांत फक्त 21 धावाच करता आल्या आहेत. तसेच यष्टिरक्षणामध्येही आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी टीम इंडियामध्ये 20 वर्षीय ऋषभ पंतची वर्णी लागेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. ऋषभ पंतने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दोन प्रथम श्रेणी सामन्यांत तीन अर्धशतके ठोकली आहे.

करणऐवजी स्टोक्सची एण्ट्री

न्यायालयीन प्रकरणातून सुटका झालेल्या बेन स्टोक्सची इंग्लंड संघात एण्ट्री झाली आहे. मात्र त्याला संघात प्रवेश दिल्यामुळे सॅम करण या युवा अष्टपैलू खेळाडूला आपले स्थान गमवावे लागले आहे.

विराट, बुमराह फिट पण…

पाठीच्या दुखापतीमधून विराट जवळपास सावरला असल्याच्या वृत्ताने चाहत्यांनी धाकधूक कमी झाली असून जसप्रीत बुमराह, आर. अश्विन आणि हार्दिक पंडय़ा फिट झाल्याने हिंदुस्थानच्या चमूत समाधानाचे वातावरण आहे. पण काही वरिष्ठ खेळाडूंमधील आत्मविश्वासाचा अभाव समोर आल्याने संघात बदल करणे आवश्यक आहे. मुरली विजय आणि शिखर धवन यांचे दक्षिण आफ्रिका आणि सध्याच्या इंग्लंडच्या दौऱयातील अपयशाकडे दुर्लक्ष करून चालणार नसले तरी संघ व्यवस्थापन त्यांना अजून एक संधी देतील यात शंका नाही.