सातारा जिल्ह्यातील यात्रांवर तिसऱ्या लाटेचे सावट, काळूबाई, यमाईदेवी, पालच्या खंडोबाच्या यात्रेचे भाविकांना वेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रासह आजूबाजूच्या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवची काळूबाई, औंधची यमाई तसेच पालच्या खंडोबाची वार्षिक यात्रा या महिन्यात आहे. परंपरेनुसार भाविकांना या यात्रांचे वेध लागले असले, तरी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या यात्रांवर ‘तिसऱ्या लाटे’चे सावट आहे. दरम्यान, या यात्रांच्या अनुषंगाने जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951चे कलम 36 लागू केले आहे. दरम्यान, मांढरदेवच्या यात्रेत पशुबळी व वाद्य वाजविण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती बन्सल यांनी दिली.

जानेवारीच्या सुरुवातीलाच पुसेगाव (ता. खटाव) येथील परमपूज्य सेवागिरी महाराजांचा रथोत्सव पार पडला. आता मांढरदेवच्या काळूबाईची यात्रा 16 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत साजरी होत आहे. शाकंभरी पौर्णिमा (17 जानेवारी) हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. पौषात होत असलेल्या या उत्सवात मांढरदेवला दर मंगळवारी व शुक्रवारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी होत असते. 2005मध्ये मांढरदेव येथे काळूबाईच्या यात्रेत चेंगराचेंगरीची भयंकर दुर्घटना घडली होती. त्या पार्श्वभूमीकर यात्रेत पशुबळी देण्यास बंदी आहे.

उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने यात्रेत पशुबळी देण्यास बंदी केली असून, या आदेशाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कालावधीत कोणत्याही ठिकाणी पशुबळी दिला जाणार नाही, यासाठी पोलीस दल व प्रशासन योग्य ती दक्षता घेणार आहे तसेच या ठिकाणी ढोल व वाद्यांच्याा आवाजामुळे शेजारी काही अनुचित प्रकार घडला तरी काही ऐकू येत नसल्याने व तेही एक मागील दुर्घटनेचे कारण असल्याने मांढरदेव येथील काळूबाई मंदिर परिसरात महाद्वार ते मंदिर व परत महाद्वारपर्यंत वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली आहे.

कराड तालुक्यातील पाल येथील श्री खंडोबादेवाची यात्रा 15 ते 19 जानेवारी या कालावधीत असून, 15 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. तसेच औंध (ता. खटाव) येथील श्री यमाईदेवीची यात्रा 16 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत होत असून, 17 जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या यात्रांसाठीही महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

दरम्यान, या सर्व यात्रांवर सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे सावट आहे. मागील दोन वर्षांत या यात्रा कोरोनामुळे केवळ औपचारिकरित्या पार पडल्या आहेत. कोरोनाच्या कडक निर्बंधांमध्ये केवळ परंपरा सांभाळल्या गेल्या आहेत. डिसेंबरअखेर कोरोना परतीच्या वाटेवर वाटत असतानाच पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.

या सर्व यात्रांच्या संबंधाने वाहतुकीचे नियमन करणे, तसेच यात्रेच्या कार्यक्रमामध्ये व्यक्तींचे वर्तन कसे असावे आणि ध्वनि प्रदूषणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या निर्बंधांचे पालन व्हावे, ध्वनिक्षेपकाचा वापर योग्य प्रकारे व्हावा, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख अजयकुमार बन्सल यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम-1951चे कलम 36 लागू केले आहे. या आदेशानुसार निर्बंधांचे यथोचित पालन होण्यासाठी बंदोबस्तासाठी नेमलेल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस निरीक्षक, सर्व सहायक पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व अंमलदारांना निर्देश देण्याचे अधिकार प्रदान केले आहेत.