
आईस्क्रीम हा शब्द उच्चारला तरी सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आईस्क्रीमच्या वेगवेगळ्या फ्लेवर्सबद्दल आपण ऐकलंय, मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती 24 कॅरेट सोन्यापासून सजवलेल्या आईस्क्रीमची. होय, हे अगदी खरंय.
एक फूड ब्लॉगरने आपल्या इन्स्टाग्रामवर या सोन्याच्या आईस्क्रीमचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. बघता बघता तो व्हायरल झाला आहे. या आईस्क्रीमचे नाव ‘माईटी मिडास’ असे आहे. ते हैदराबाद येथे ह्यूबर अॅण्ड हॉली पॅफेमध्ये मिळत आहे. व्हिडीओमध्ये दुकानदार एक आईस्क्रीम कोन घेतो. त्या कोनमध्ये चॉकलेट नटस्, ड्रायफ्रूट आणि चॉकलेट सिरप टाकतो. त्यानंतर डार्क चॉकलेट आईस्क्रीम एका साच्यात टाकून कोनमध्ये भरतो. त्यावर 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावतो.
चेरी आणि जेली बॉलने ती डिश सजवून ग्राहकाला देतो. 24 कॅरेट सोन्याचे हे आईस्क्रीम खाण्यासाठी ग्राहकांना 500 रुपये आणि अतिरिक्त टॅक्स मोजावा लागणार आहे. अनेकांनी हे आईस्क्रीम खाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
























































