
ज्या क्षणी न्यायालयातील रामशास्त्री बाणा संपेल, त्या क्षणी लोकशाहीला श्रद्धांजली वाहण्याची सभा घ्यावी लागेल!
‘स्वातंत्र्यलढय़ाशी तीळमात्र संबंध नव्हता तेच आज आपले स्वातंत्र्य गिळायला निघाले आहेत. आपल्याला पुन्हा गुलामगिरीत ढकलायला निघाले आहेत. त्याविरुद्ध एकत्र येऊन लढावेच लागेल. ही लढाई देशाची आहे, लोकशाहीची आहे, माझ्या शेतकऱ्याची आहे. पुढच्या पिढीची आहे. आता फक्त लढायचे आहे… जिंकेपर्यंत लढायचे आहे,’ असा वज्रनिर्धार आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मालेगाव येथे शिवगर्जना सभेत उसळलेल्या अथांग जनसागराच्या साक्षीने केला. श्रीकृष्णाने करंगळीवर गोवर्धन उचलला तेव्हा त्याला जशी सवंगडय़ांची साथ मिळाली तसेच लाखो हात आता उठले तर देशाचे स्वातंत्र्य गद्दारांपासून कितीतरी वरती उचलून ठेवता येईल, असे उद्धव ठाकरे उद्गारताच जनसागराने हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला. तुमचे हेच प्रेम, हाच विश्वास, हीच जिद्द कायम ठेवा… याच ताकदीच्या जोरावर मी लढाईसाठी उभा ठाकलो आहे, असा दुर्दम्य आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला.
खेडच्या अतिविराट जाहीर सभेनंतर आज मालेगावात उद्धव ठाकरे यांची रेकॉर्डब्रेक सभा झाली. या सभेचे अथांग असे वर्णन करत उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली. आपल्या चाळीस मिनिटांच्या तडाखेबंद भाषणात उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत भाजप आणि मिंध्यांची धुलाई केली.
शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटाला जाऊन मिळालेले आमदार सुहास कांदे यांची यावेळी उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली. नाशिक, मालेगाव हा कांद्याचा पट्टा आहे असे सांगत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित गर्दीला विचारले, कांद्याला भाव मिळाला की नाही?…गर्दीतून आवाज आला ‘नाही…’ त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पण मी म्हणतो मिळाला’. कांदा खरेदी झाली की नाही?…गर्दीतून आवाज आला ‘नाही…त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘पण मी म्हणतो ‘कांदा खरेदी झाली.’
उद्धव ठाकरे यांचे ते म्हणणे ऐकून उपस्थित अवाक् झाले. मग ते म्हणाले, गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी झाली नाही का? त्यावर एकच हशा पिकला. उद्धव ठाकरे यांनी सुहास कांदेंवर निशाणा साधल्याचे गर्दीच्या लक्षात आले. मग किती भाव मिळाला? असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच ‘पन्नास खोके…’ असा आवाज घुमला. एका कांद्याला जर पन्नास खोके मिळाले तर मग शेतकऱ्यांच्या कांद्यालाही भाव मिळाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
शिवसेना मिंध्यांच्या वडिलांची नाही
शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंध्यांच्या वडिलांनी नाही, असे ठणकावून सांगतानाच, स्वतःच्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते म्हणून माझ्या वडिलांचे नाव घेता का? माझ्या वडिलांनी उभारलेली शिवसेना चोरता?’ असा सवालही उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख न करता केला.
अहो बावनकुळे, नावाइतक्या तरी मिंध्यांना जागा द्या!
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपचे आजी-माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीही खिल्ली उडवली. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील बरेच दिवस मास्क घालून फिरत होते. ते प्रदेशाध्यक्ष असताना म्हणाले होते की, सत्तांतर झाले तेव्हा हृदयावर दगड ठेवून मिंध्यांना घेतले. आताचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, आम्ही मिंधे गटाला 48 जागा देणार. मी म्हणतो तुमच्या नावाइतक्या तरी जागा द्या.’
भाजप मिंध्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार का?
भाजप मिंध्यांच्या नेतृत्वाखाली पुढची निवडणूक लढणार का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. भाजपला वाटत असेल की, आपण ठाकरेंपासून शिवसेना तोडू शकतो. पण तुमची बावन काय एकशेबावन कुळे खाली उतरली तरीही ठाकरेंची शिवसेना संपवू शकणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला. तातडीने निवडणुका घ्या. तुम्ही मोदींच्या नावाने मते मागा आणि मी माझ्या वडिलांच्या नावाने मागतो. बघू महाराष्ट्र कोणाच्या बाजूने कौल देतो ते,’ असे उघड आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
हिंदुत्वापासून दूर गेल्याची एकतरी घटना दाखवा
मी हिंदुत्वापासून लांब झालो अशी एकतरी घटना दाखवा, असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मिंध्यांना दिले. आमचे हिंदुत्व विकृत नाही. शेंडी-जानव्याचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असे माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि वडील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, तेच मी बोलतो, असेही त्यांनी बजावले.
…हेच भाजपचे हिंदुत्व आहे का?
‘अनिल देशमुखांना आत टाकले. त्यांच्या पाच-सहा वर्षांच्या नातीची चौकशी केली. लालूप्रसाद यादव यांची सून गरोदर असतानाही ती बेशुद्ध होईपर्यंत तिची चौकशी केली गेली. हे आम्हाला कुणी शिकवले नाही. परस्त्री ही मातेसमान असते. तिचा आदर राखा,’ अशा शब्दांत भाजपवर हल्लाबोल करतानाच, हेच भाजपचे हिंदुत्व आहे का? असा खणखणीत सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. एकेकाळी भाजपच्या व्यासपीठावर साधुसंत असायचे, त्यांची शिकवण कुठे गेली? असाही टोला त्यांनी लगावला.
भाजप म्हणजे ‘भ्रष्ट झालेला पक्ष’
उद्धव ठाकरे म्हणाले, कन्याकुमारीपासून कश्मीरपर्यंत पाहिले तर भाजपने विरोधी पक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना स्वतःच्या पक्षात घेतले आहे. आमच्याकडे निरमा पावडर आहे. भ्रष्ट लोक धुतले की, स्वच्छ होतात हे भाजपचेच एक आमदार विधान परिषदेत बोलले. आता भाजपने पक्षाचे नाव बदलावे. भ्रष्ट माणसे ते सत्तेसाठी पक्षात घेत आहेत. भाजप म्हणजे ‘भ्रष्ट झालेला पक्ष’.
लढायला तयार आहे, सर्वांची साथ हवी
‘2024 च्या निवडणुकीत भाजपाला पुन्हा सत्तेवर बसवले तर या देशात निवडणुका होणार नाहीत. ही लढाई आपल्या देशाची आहे. लोकशाहीची आहे. शेतकऱ्यांची आहे. त्यात तुम्ही सोबत आहात का?’ असे उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थित जनसमुदायाने गगनभेदी ‘हो’कार दिला. ‘ही एवढी शक्ती एकवटली तर आपले स्वातंत्र्य कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवधनुष्य पेलताना रावण उताणा पडला तिथे मिंधे कसे टिकणार? तेही उताणे पडणार. जनतेच्या पाठिंब्यावर आपण लढण्यासाठी तयार आहोत. आता सर्वांची साथ महत्वाची आहे.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्हीही तुमच्या कुटुंबीयांचे लागेबांधे बाहेर काढू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्यांविरुद्ध यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भाजपचा उद्धव ठाकरे यांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले की, ‘भाजपचे काही नेते इतरांचे चारित्र्यहनन करतात. कुणाच्या मुलावर, कुणाच्या पत्नीवर आरोप करतात. पण त्यांच्या नेत्यावर टीका केली तर देशाचा अपमान झाला म्हणतात. मोदींवर टीका केली तर हिंदुस्थानचा अपमान केला म्हणतात. मग घराघरात पोलीस घुसतात. कुटुंबीयांना अटक करतात.’ असे सांगतानाच, आमच्या कुटुंबीयांच्या बदनामीचा प्रयत्न थांबवला नाही तर तुमच्या घरातील लागेबांधे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही,’ असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. परंतु आमच्यावर हिंदुत्वाचे संस्कार असल्याने आम्ही तसे करत नाही, असेही ते म्हणाले.
भाजपवर वार
- यांच्या नेत्यांवर आरोप केल्यावर हिंदुस्थानचा अपमान होतो. माझा हिंदुस्थान एवढा क्षूद्र नाही. मोदी म्हणजे हिंदुस्थान नव्हे!
- मिंध्यांच्या नेतृत्वात तुम्ही निवडणुका लढणार आहात का? ते आताच जाहीर करा!
- तुमची 52 काय 152 कुळं खाली उतरली तरीही ठाकरेंपासून शिवसेना तुम्ही तोडू शकत नाही.
मिंध्यांवर प्रहार
- होय, ही शिवसेनाच आहे, माझ्या वडिलांनी स्थापन केली, मिंधेंच्या वडिलांनी नाही.
- तुम्ही तुमच्या कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारून घेतला.
- हा शिक्का आयुष्यभर तुमच्या कपाळावर राहणार आहे.
- सत्ता गेल्याचे दु:ख नाही, पण चांगले काम करणारे सरकार तुम्ही पाडले. खंडोजी खोपडेची अवलाद, गद्दाराच्या हातात भगवा शोभत नाही.
गद्दारांना त्याच खोक्याखाली चिरडून टाकू – खासदार संजय राऊत
या विराट सभेसाठी उसळलेले हे भगवे तुफान कुणीही रोखू शकत नाही. हे भडकलेले शोले आहेत. या शिवसेनेशी लढण्याची हिम्मत आहे का, असा खणखणीत सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गद्दार मिंधे गटाला केला. निवडणूक आयोगाने चिन्ह, नाव काढले पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली खरी शिवसेना ही ठामपणे हाती भगवा घेऊन उभी आहे. निवडणूक आयोगाच्या बापाला विचारून शिवसेनाप्रमुखांनी शिवसेना स्थापन केली नाही. येथे येऊन आयोगाने शिवसेना काय आहे ते बघावे. ही शिवसेनाच गद्दारांना त्याच खोक्याखाली चिरडून टाकेल. ही खरी प्रामाणिक आणि निष्ठावंतांची शिवसेनाच पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा फडकवेल. शेतकरी, कष्टकऱ्यांना सुखाचे दिवस येतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, आमदार आमशा पाडवी यांचीही भाषणे झाली. जीवन कामत, संजय सावंत, अशोक धात्रक, बबन थोरात, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, प्रवीण नाईक, गुलाबराव वाघ, हिलाल माळी, अल्ताफ खान, बापू जाधव, आमदार नरेंद्र दराडे, आमशा पाडवी, महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गणेश धात्रक, नितीन आहेर, कुणाल दराडे, हर्षल माने, विष्णू भंगाळे, अतुल सोनवणे, हेमंत साळुंके, शरद पाटील, नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गीते, राजाभाऊ वाजे, अनिल कदम, योगेश घोलप, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.
भाजपाचे कारस्थान हाणून पाडा
शिवसेनेशी ज्या चाळीस आमदारांनी गद्दारी केली, त्याचे कर्तेकरवते भाजपच होते. त्यांच्या पायाखालची वाळू वेगाने सरकत आहे. मराठी माणूस जागरूक झाला आहे, तो या ढोंगी लोकांना भुईसपाट करेल, असा विश्वास शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात आणि देशात ज्या-ज्या कारवाया भाजपाने घडवल्या, तेव्हा तेव्हा त्यांची शस्त्रे त्यांच्यावरच उलटली. राज्यातील उद्योग, मुंबईचा हिरे व्यापार, कामगार शिक्षण संस्था, सागरी पोलीस अकादमी त्यांनी पळवली. मुंबई केंद्रशासीत करायची, ती जिंकायची, म्हणून ही सगळी लूट सुरू आहे, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्राला गरज शिवसेनेचीच
राज्यातील शेतकरी आत्महत्या थांबल्या पाहिजे, बहुजनांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे, असे उपनेते अद्वय हिरे म्हणाले. प्रबोधनकार ठाकरे आणि कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठे योगदान दिले. आज महाराष्ट्र संकटात असताना शिवसेनेसोबत आलो नसतो, तर भाऊसाहेब हिरे यांनी माफ केले नसते, असे सांगून महाराष्ट्रात शिवसेनेला क्रमांक एकचा पक्ष बनवू, असा विश्वास व्यक्त केला. वीस वर्षे मालेगावला विकासापासून दूर ठेवणाऱ्या दादा भुसेंचा त्यांनी समाचार घेतला.
फटकारे
- केंद्र सरकार न्यायालयालाही बटीक बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. पण न्यायालयात रामशास्त्री बाण्याचे न्यायमूर्ती तिथे बसले आहेत. ज्या क्षणी न्यायालयातील रामशास्त्री बाणा संपेल त्या दिवशी आपल्याला लोकशाहीची श्रद्धांजली सभा घ्यावी लागेल
- मिंध्यांनो, काय घेऊन गेलात. माझ्यावर प्रेम करणारा एक माणूस नेऊ शकला नाहीत. एकही शिवसैनिक नेऊ शकला नाहीत. पण कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारून घेतलात. तो आयुष्यभर पुसला जाणार नाही.
- निवडणूक आयोगाचे गांडूळ झाले आहे. निवडणूक आयोगाच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले नसतील तर खेड, मालेगावची सभा बघा. हजारोंच्या संख्येने पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्रे दिली. लाखोंच्या संख्येने सदस्यसंख्या नोंदवली. ती कागदपत्रे काय रद्दी म्हणून मागितलात?
मर्दगडी अद्वय हिरे सत्तेतून शिवसेनेत आला
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, ‘अद्वय हिरे यांना धन्यवाद. जगरहाटी असते की लोकं लोहचुंबकाप्रमाणे सत्तेकडे जातात. पण मर्दगडी अद्वय हिरे सत्तेतून शिवसेनेत आला. कदाचित भाजपमध्ये राहिला असता तर कोपराला गुळ लावलाच होता. काहीतरी करतो म्हणून. दिलेही असते, पण एकदा विश्वास तुटला की तुटला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत भाऊसाहेब हिरे हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते. तोच एकमेव धागा आम्हाला एकत्र घेऊन आला. आज त्याचीच खरी गरज आहे.’
सावरकरांचा अपमान सहन करणार नाही
लोकशाहीच्या लढाईसाठी शिवसेना राहुल गांधी यांच्यासोबत राहिली. कन्याकुमारीहून कश्मीरपर्यंत काढलेल्या यात्रेमध्येही खासदार संजय राऊत सहभागी झाले होते. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान शिवसेनेला अजिबात पटणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. सावरकरांनी जे कार्य केले ते येऱ्यागबाळय़ाचे काम नाही. सावरकर काय होते हे वाचता येऊ शकेल; पण त्यांनी स्वातंत्र्यासाठी जे अनन्वित अत्याचार सहन केले तोसुद्धा एक त्याग होता. सावरकरांनी 14 वर्षे रोज मरण सहन केले. राहुल गांधींना मी जाहीरपणे सांगतो की, सावरकर आमचे दैवत आहेत. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आपण एकत्र आलोय ते या देशाची लोकशाही वाचविण्यासाठी. त्याच्यामध्ये आता कुठे फाटे फुटू देऊ नका. तुम्हाला डिवचलं जातंय. मात्र आता जर का वेळ चुकली तर आपला देश हुकूमशाहीकडे गेल्याशिवाय राहणार नाही, असेही उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना उद्देशून म्हणाले.

























































