खुशखबर! दरवर्षीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा असणार सुसह्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

मार्च महिना सुरू झाला की आपल्याला उन्हाळ्याच्या काहिलीची चाहूल लागते. उष्ण झळा, तापलेलं वातावरण आणि शरीरातून निघणाऱ्या घामाच्या धारा यांनी जीव कसा मेटाकुटीला येईल, याची मनातल्या मनात तयारी सुरू होते. पण, यंदा मात्र चित्र तुलनेने बरं म्हणावं असं आहे. कारण, यंदाचा उन्हाळा हा सुसह्य असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याने 2019चा उन्हाळा हा तुलनेने कमी त्रासदायक असल्याचं अनुमान वर्तवलं आहे. याचा सर्वाधिक फायदा मध्य महाराष्ट्राला होणार आहे. पुणे, नाशिक, जळगाव, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा सरासरीपेक्षा थोडाच वर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यातच 40 अंश गाठणाऱ्या या जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे.

हा परिणाम उत्तरेकडून येणाऱ्या कमी उष्णतेच्या वाऱ्यांमुळे हा बदल घडणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही उष्णतेची लाट तुलनेने कमी स्वरुपाची असणार आहे.