थिसारा परेरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त

श्रीलंकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. श्रीलंका क्रिकेट बोर्डाची संघनिवड समिती थिसारा परेरासह काही वरिष्ठ क्रिकेटपटूंना एकदिवसीय संघातून वगळणार असल्याचे वृत्त होते. या चर्चेनंतर थिसारा परेराने निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र, तो फ्रेंचायझी क्रिकेट खेळणे यापुढेही सुरूच ठेवणार आहे.

श्रीलंका क्रिकेटच्या (एसएलसी) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय थिसारा परेराने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची माहिती बोर्डाला दिली आहे. श्रीलंकेचा संघ आगामी काळात बांगलादेश आणि इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयासाठी दिमुथ करुणारत्ने, अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, सुरंगा लकमल आणि थिसारा परेरा या वरिष्ठ खेळाडूंना मर्यादित षटकांच्या संघात घेण्याची आता इच्छा नाही, असे श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱयाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर थिसारा परेराने लागलीच आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

6 चेंडूंत ठोकले 6 षटकार

थिसारा परेराने काही दिवसांपूर्वी एका स्थानिक सामन्यात 6 चेंडूंत 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. आर्मी स्पोर्टस् क्लबकडून खेळताना ब्लूमफिल्डविरुद्धच्या सामन्यात थिसारा परेराने ही ऐतिहासिक खेळी केली होती. एका षटकात सहा षटकार मारणारा थिसारा परेरा हा श्रीलंकेचा पहिला क्रिकेटपटू ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या