एआयचा वापर करणारे सर्वाधिक असुरक्षित, नवीन अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात बहुतांशी सर्वच क्षेत्रामध्ये एआयचा (AI)वापर हा दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढू लागलेला आहे. परंतु अँथ्रोपिकच्या एका नवीन अभ्यासातून एक धक्कादायक वास्तव समोर आलेले आहे. या अभ्यासांती असे निदर्शनास आले आहे की, जे कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वाधिक वापर करतात, त्यांनाच नोकरीबाबतची असुरक्षितता सर्वाधिक जाणवत आहे. एआयचा (AI) वाढता प्रभाव कर्मचाऱ्यांच्या विचार करण्याच्या आणि कामाच्या पद्धती कशा बदलत आहे हे समजून घेण्यासाठी, कंपनीच्या ‘क्लॉड’ नावाच्या चॅटबॉटच्या माध्यमातून जवळपास 81 हजार लोकांच्या सर्वेक्षणावर हे संशोधन आधारित आहे.

अहवालानुसार, ज्या नोकऱ्यांमध्ये एआयचा वापर सर्वाधिक आहे, तिथे काम करणाऱ्यांना नोकरी जाण्याची भीती अधिक वाटते. एआयमुळे जाॅब जाण्याची भीती ही सॉफ्टवेअर या क्षेत्राशी संबंधितांना सर्वात जास्त असल्याचे निदर्शनास आले. हे भय केवळ इथल्यापुरते मर्यादीत नाही तर, करिअरची सुरुवात नव्याने करणाऱ्या तरुणांमध्ये ही भीती अधिक दिसून येत आहे. जवळपास पाचपैकी एका व्यक्तीला वाटते की एआयचा त्यांच्या भविष्यातील नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे मात्र बहुतेकांनी एआयमुळे उत्पादकतेत सुधारणा झाल्याचे सांगितले. अनेकांनी सांगितले की, जी कामे पूर्वी पूर्ण व्हायला काही महिने लागायचे, तिच कामे आता काही दिवसांत पूर्ण होतात.

एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार हा बदल केवळ एकाच गटापुरता मर्यादित नाही. उच्च-पगारदार आणि कमी-उत्पन्न असलेल्या दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांनी एआयमुळे होणाऱ्या फायद्यांची नोंद केली आहे. फ्रीलान्सर आणि गिग वर्कर्स म्हणतात की, एआय मुळे त्यांना ऑनलाइन स्टोअर्स किंवा सेवांसारखे छोटे व्यवसाय सुरू करण्यास मदत होत आहे.

एआयची वाढती व्याप्ती काम अधिक जलद आणि सोपे करत असली तरी, ती लोकांमध्ये असुरक्षितता देखील निर्माण करत आहे. त्यामुळेच आता हा प्रश्न निर्माण होतो की, एआय भविष्यात नोकऱ्यांसाठी धोका निर्माण करेल की नवीन संधी निर्माण करेल?