पावसानं झोडपल्यानं भाजीपाल्याला महागाईची फोडणी? शेतकरी हैराण, ग्राहकांची दाणादाण

राज्यात दोन आठवड्यााधीच मान्सून दाखल झाला आणि राज्यात दाणादाण उडाली. अनेक भागांत पाणी साचलं होतं तर अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे हजारो हेक्टरवरची पिकं उद्ध्वस्त झाली असून या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आता सर्वसामान्यांनाही याचा फटका बसणार आहे. कारण पावसामुळे भाजीपाला नष्ट झाला असून पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे भाज्यांचे दर वाढतील अशी भिती व्यक्त होत आहे.

काल झालेल्या पावसामुळे राज्यातील आणखी तीन हजार हेक्टरवरील पीकं नष्ट झाली आहेत. आधीच्या पावसामुळे 31 हजार 889 हेक्टरवरील पीकं नष्ट झाली होती.

पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती, जळगाव, बुलढाणा आणि अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर आणि पुणे या जिल्ह्यांना बसला आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात 3 हजार 230 तर सोलापूर जिल्ह्यात 1252 हेक्टरवरील पीकं नष्ट झाली आहेत. पुण्यात 676 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे.

मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे आंबा, केळी, डाळिंब आणि भाजीपाल्यांना फटका बसला आहे. सोलापुरात केळी, आंबा आणि डाळींब फळांना फटका बसला आहे. तर कांदा लिंबू, ज्वारी आणि मुगाचे पीक नष्ट झाले आहे.

या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला आहे. अमरावतीतील 12 हजार 295 हेक्टरवरची पीकं नष्ट झाली आहेत. त्यानंतर जळगाव 4 हजार 538 हेक्टर, बुलढाणा 4 हजार 3 हेक्टर, जालना 1726 हेक्टर आणि अहिल्यानगरमध्ये 1156 हेक्टरवरील पीकं नष्ट झाली आहेत.

पावसामुळे पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक घटली आहे. त्यामुळे भाज्यांच्या किमती गगनाला भि़डल्या आहेत. काल एक किलो टोमॅटोची किंमत 5 रुपये होती. आज एक किलो टोमॅटोला 20 ते 25 रुपये मोजावे लागत आहेत.