
कोरोना प्रसाराचा धोका असल्यामुळे मास्कशिवाय फिरणाऱ्यांना पालिकेने चांगलाच दणका द्यायला सुरुवात केली असून, एफ उत्तर विभागात दोन दिवसांत 18 जणांकडून प्रत्येकी एक हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी ही माहिती दिली. कोरोना रोखण्यासाठी यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.
कोरोनाचा प्रसार रोखणे आणि कोरानापासून बचाव होण्यासाठी मास्क अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या पाश्र्वभूमीवर मास्क न घालणाNयांना एक हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार घेण्यात आला आहे. यानुसार एफ उत्तर विभागात मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. एफ उत्तर विभागात कोरोनामुळे आतापर्यंत 250 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये सोशल डिस्टंसिंगबरोबरच मास्क वापरणे अनिवार्य असल्यामुळे पालिकेच्या माध्यमातून जोरदार कारवाई सुरू आहे. दरम्यान, कोरोना रोखण्यासाठी एफ उत्तर विभागात आतापर्यंत साडेतीन लाख लोकसंख्या असलेल्या या भागात घरोघरी तपासणी, स्क्रिनिंग करण्यात आली आहे. वॉर्डमध्ये ‘कोरोना केअर सेंटर – 1’ची संख्या 3 असून सीसीसी-2 केंद्र चार आहेत. यामध्ये 1700 बेड क्षमता असणाऱ्या सीसीसी-1 मध्ये सध्या 400 जण देखरेखीखाली असून सीसीसी-2 मध्ये 57 जण क्वारंटाइन आहेत. काही रुग्ण होम क्वारंटाइन आहेत. या सर्व रुग्णांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होत आहे.
‘एफ उत्तर’मध्ये कोरोना नियंत्रणात
पालिकेच्या एफ उत्तर विभागात माटुंगा, वडाळा, शीव आणि अॅण्टॉप हिल असा परिसर येतो. दाटीवाटीच्या या भागात सुरुवातीपासूनच कोरोनाचा प्रसार वेगात झाल्याने एफ उत्तर कोरोना हॉटस्पॉट ठरला. मात्र गेल्या महिनाभरात पालिकेच्या माध्यमातून प्रभावी क्वारंटाइन, निर्जंतुकीकरण आणि घरोखरी स्क्रिनिंग केल्यामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे.
आतापर्यंत या विभागात एकूण 3355 कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र यातील 2298 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे. सध्या तर 807 अॅक्टिव्ह केस असल्याची माहिती सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांनी दिली. आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले हेदेखील वेळोवळी विभागाचा आढवा घेत आहेत.
























































