
देशभरात इंडिगो विमानसेवा ठप्प झाल्यामुळे हजारो प्रवासी याघडीला त्रस्त झाले आहेत. याच मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सामान्य जनतेच्या समस्यांबद्दल सरकार हे उदासीन आहे. सरकार हे फक्त निवडणूकांच्या रणनीतींमध्ये व्यस्त आहेत. संसदेत सुरू असलेल्या सांस्कृतिक आणि राजकीय चर्चेदरम्यान ममता बॅनर्जी यांनी भाजपवरही टीका केली. सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
सध्याच्या घडीला देशभरात मोठ्या संख्येने इंडिगो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, इंडिगो विमानसेवेबाबत प्रचंड गोंधळ सुरु आहे. केंद्र सरकारवर थेट हल्ला चढवत ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही परिस्थिती सामान्य नागरिकांसाठी आपत्ती बनली आहे. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती पूर्ववत करायला हवी.
कोलकाता येथे माध्यमांशी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, इंडिगोवर आलेल्या संकटामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. जनतेसाठी कोणते पर्याय शिल्लक आहेत? इंडिगोची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि आपत्तीजनक आहे. हजारो प्रवासी विमानतळावर अडकले आहेत आणि त्यांना त्रास होत आहे.
केंद्र सरकार या संकटाला गांभीर्याने घेत नसल्याचा बॅनर्जी यांनी आरोप केला असून, त्यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी तातडीने योजना तयार करण्यात यावी असे सरकारकडे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या, भाजप सरकारला देश आणि जनतेशी संबंधित समस्यांमध्ये रस नाही. त्यांना फक्त संस्था कशा ताब्यात घ्यायच्या याचीच चिंता आहे.”



























































