हजारो आंदोलक, साडेदहा हजार गाड्या; तरीही मुंबई थांबू दिली नाही, वाहतूक पोलिसांचे अचूक नियोजन, सौजन्यशिलता अन् शिस्तबद्ध कामगिरी

प्रतिकात्मक छायाचित्र

आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो आंदोलक मुंबईत धडकले होते. एकाच वेळी असंख्य आंदोलक व त्यांची जवळपास साडेदहा हजार गाडय़ा आल्याने दक्षिण मुंबईत वाहतुकीचा गंभीर प्रश्न उभा ठाकला होता. पण मुंबईचे वाहतूक पोलीस त्या परिस्थितीला लिलया सामोरे गेले आणि त्यांनी अचूक नियोजनाच्या आधारे मुंबईची वाहतूक थांबू दिली नाही.

आंदोलनासाठी हजारो आंदोलक जवळपास साडेदहा हजार गाडय़ा घेऊन मुंबईला आले होते. इतक्या मोठय़ा संख्येने आंदोलक त्यांच्या वाहनांसह येतील हे गृहित धरून पोलीस आयुक्त देवेन भारती व सहआयुक्त अनिल कुंभारे यांनी आधीच वाहतुकीचे व्यवस्थित नियोजन करून ठेवले होते. त्यानुसार साडेपाच हजार गाडय़ा शिवडी, रे रोड, वडाळा, डॉक यार्ड परिसरात पार्क करण्यास सांगण्यात आले होते. तरीही पाच हजार गाड्या दक्षिण मुंबईत आल्या होत्या. इतक्या मोठ्या  संख्येने वाहने, कुलाबा, मरीन ड्राइव्ह परिसरात पार्क करण्यात आल्या होत्या. शिवाय हजारो आंदोलक रस्त्यावरदेखील उतरले होते. परिणामी दक्षिण मुंबईत वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. असे असतानाही वाहतूक पोलिसांनी कच खाल्ली नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एसीपी अबेद सय्यद, वरिष्ठ निरीक्षक योगेश चव्हाण, नितीन गायकवाड, नागटिळक, संजय देशमुख, खाडे तसेच कर्मचाऱयांनी वेगवेगळ्या मार्गांनी वाहतूक वळवून कुठेही खोळंबा होऊ दिला नाही. परिणामी पाच दिवस वाहतूक व्यवस्था सुरळित सुरू राहिली आणि त्याचा नागरिकांना मोठा फटका बसला नाही.

पाच दिवस चाललेल्या आंदोलना वेळी वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, नागरिकांना वाहतूककोडींचा त्रास होऊ नये याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली होती. त्यानुसार शिस्त व सौजन्यशिलतेने सामोरे जात आम्ही वाहतूक सुरळित ठेवली. आंदोलकांनी आम्हाला सहकार्य केले.

अनिल कुंभारे, सहआयुक्त (वाहतूक)