
पंजाबमध्ये 37 वर्षांनंतर आलेल्या भीषण पुरामुळे एक हजाराहून अधिक गावे आणि 61 हजार हेक्टरहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. आतापर्यंत 11300 लोकांना वाचवण्यात आले आहे, तर 4700 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप राज्यातील आप सरकारने केला.
जम्मू-कश्मीरमधील मुसळधार पावसामुळे सतलज, बियास, रावी नद्यांना पूर आला आहे. पुरामुळे गुरुदासपूर, अमृतसर, तरनतारन, फिरोजपूर, पठाणकोट, फाजिल्का, कपूरथला आणि होशियारपुरला जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. पुरात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कर, हवाई दल, बीएसएफ, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि पंजाब पोलिसांची टीम काम करत आहे.
आरोप- प्रत्यारोप
- विरोधकांनी आप सरकारला पूरस्थितीमुळे लक्ष्य केले आहे, तर राज्याचे जलसंपदामंत्री बी. कुमार गोयल यांनी ‘केंद्राच्या अखत्यारीतील भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाने जूनमध्ये वेळेवर पाणी सोडले असते तर विध्वंस मोठ्या प्रमाणात कमी करता आला असता,’ असा दावा केला.
- महापुरामुळे पंजाब राज्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रारंभिक अहवालातून असं समजतंय की, फाजिल्का जिह्यात 41099 एकरपेक्षा जास्त जमीन बाधित झालेय. याशिवाय फिरोजपूर, कपूरथला आणि होशियारपूर यासारख्या अन्य जिह्यांतही हजारो हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. बरनाला, कपूरथला आणि फिरोजपूर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला.
- पुरामुळे बाधित झालेली एकतृतीयांश गावे गुरुदासपूर जिह्यात (323 गावे) आहेत.